क्षयरोगाबाबतची नागरिकातील भीती दूर करा- डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

क्षयरोग हा आजार पूर्णपणे बरा होणारा असून याबाबत नागरिकात भीती निर्माण झाली आहे. डॉक्टरांचा सल्ला व योग्य औषध उपचार घेतला तर हा आजार पूर्णपणे बरा होतो. याबाबत कोणतीही शंका न बाळगता नागरिकांना जागरूक करून त्यांच्या मनातील भीती दूर करा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्ण  शोधून मोहिमेचा पहिला टप्पा सोमवार पासून ता. १५ ते २५ नोव्हेंबर पर्यंत सुरू होत असल्याने याबाबत आरोग्य  कर्मचारी व आशा वर्कर व स्वयंसेवी संस्था यांना शोध मोहीम कालावधीत कोणती कामे करावे लागतील, सर्वेक्षण करताना घ्यावयाची काळजी तसेच संशयित रुग्ण शोधल्या नंतर त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी आणणे, जनजागृती तसेच सर्वेक्षण कामी लागणारे साहित्य, रिपोर्ट भरणे, रुग्णांची नोंद ठेवणे अशा विविध सूचना देत आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी डॉ. प्रांजली पाटील, डॉ. स्वप्नील जाधव ,डॉ. तुषार पाटील, डॉ. राहुल पवार, डॉ. देवयानी शिंदे, डॉ. सी. आर. देसले, आरोग्य सहाय्यक आर. जे. सातपुते, तालुका पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पाटील, तालुका लेखापाल भूषण पाटील, वरिष्ठ पर्यवेक्षक भगवान चौधरी, मलेरिया तालुका पर्यवेक्षक डी. बी. राजहंस, सुमित शेलकर, परिचर अनिल वाणी, प्रयोग शाळा पर्यवेक्षक राजेंद्र चंद्रात्रे यांच्यासह तालुक्यातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आशा वर्कर, गटप्रवर्तक तसेच पारोळा येथील सर्वेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव आशा पाटील, यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी शोध मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घरोघरी सर्वेक्षण करताना क्षयरोग आजाराबाबत नागरिकांना समजावून सांगत योग्य मार्गदर्शन करावे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध उपचार घ्यावा असे सांगून गाव पातळीवर समाज मनात या आजाराबाबत नागरिकांना जागृतता करण्याचे आवाहन करून संशयित रुग्णांची औषध उपचार घेण्या कामाबाबत काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान मोहिमेच्या टप्पानंतर देखील या आजाराबाबत योग्य ते मार्गदर्शन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात केले जाईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.