कबचौ उमवितील प्रभारी राज संपणार केव्हा?

0

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ संपण्याआधीच वर्षभरापूर्वी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला. कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांची चार वर्षाची कारकीर्द चांगली होती. त्यांच्या विषयी कसल्या तक्रारी नव्हत्या. परंतु महाराष्ट्रातील भाजप- सेनेचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार  सत्तेवर आले आणि कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्याविषयी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तक्रारी सुरू झाल्या.

राज्यपाल नियुक्त मॅनेजमेंट परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या तालावर कुलगुरू पी.पी. पाटील काम करतात असा मुख्य आरोप या मंडळींचा होता. आणि त्यात तथ्यांशही होता. कारण कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील हे दिलीप रामू पाटील यांच्या सांगण्यानुसार वागत होते. त्यांचा बोलविता धनी दिलीप रामू पाटील हे असल्याने सर्व निर्णय दिलीप रामू पाटलांचेच असायचे. म्हणून भाजपची महाराष्ट्रातील सत्ता जाताच काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या विरोधात जणू मोहीम सुरू केली.

कुलगुरूविषयी अपमानास्पद बोलणे, असंसदीय भाषा वापरणे हे डॉ. पी.पी. पाटील यांना सहन झाले नाही. अखेर त्यांनी आपल्या कुलगुरूपदाचा मुदतीच्या आतच राजीनामा दिला. खरे तर कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील हे राजकारणाचा बळी ठरले. वर्षापूर्वी त्यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव  चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांचेकडे पदभार कुलपती महाराष्ट्राचे राज्यपाल कोशियारी यांनी सोपविला. वर्ष झाले अद्याप कायमस्वरूपी कुलगुरूंची नेमणूक झालेली नाही.

कुलगुरू पदासाठीची प्रक्रिया सुरू झाली. 2 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागविले होते. तथापि त्याची मुदत वाढविण्यात आली. परंतु अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने प्रभारी कुलगुरू म्हणून नाशिकहून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन हेच काम पहाताहेत. वर्षभरापासून पूर्णवेळ कुलगुरू नसल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रविद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मोठे नुकसान होत आहे. दृष्ट स्वरूपात काही बाबी दिसत नसल्या तरी विद्यापीठाचे पर्यायाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींचे मोठे नुकसान होत आहे.

कुलगुरूसारखे पद प्रभारी किती काळ असावा याला काही मर्यादा असतात. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीसाठी नियोजन म्हणून महिना – दोन महिने जास्तीत जास्त चार महिने प्रभारी पद असले तर त्याबाबत दुमत नाही. तथापि वर्ष उलटले तरी पूर्णवेळ कुलगुरू मिळू नये. ही बाब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. कारण नाशिकला राहून तेथील विद्यापीठाचा कारभार सांभाळून जळगावच्या विद्यापीठाचे नियमित कामकाज करणे शक्य नाही. कारण प्रभारी कुलगुरू हे जेव्हा जेव्हा महत्वाची मिटिंग असते तेव्हाच ते जळगावला येतात गेल्या अनेक महिन्यापासून ते जळगावला आलेच नाहीत. ऑनलाईन मिटिंगवरच भर दिला जातो. परंतु ऑनलाईन आणि ऑफ लाईन कामकाजात फार फरक दिसून येतो.  अनेक शैक्षणिक अडचणी संदर्भात विद्यार्थ्यांना तसेच विद्यापीठातील इतर विभाग प्रमुखांशी प्रत्यक्ष चर्चा होणे आवश्यक असते ती ऑनलाईनने शक्य होत नाही. त्यामुळे विद्यापीठातील दैनंदिन प्रशासनावर परिणाम होतो. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे विद्यापीठातील वर्ग चालू नसल्याने हे जाणवले नाही. त्यासाठी कायम स्वरूपी कुलगुरूंची तातडीने निवड करणे आवश्यक आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात फक्त कुलगुरूच प्रभारी आहेत असे नव्हे तर विद्यापीठाच्या सर्व प्रमुख पदावर उदाहरणार्थ प्र. कुलगुरू प्रा.पी.पी. माहुलीकरांच्या राजीनाम्यानंतर प्र. कुलगुरूंचा प्रभारी चार्ज विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्सचे विभागप्रमुख प्रा. बी.व्ही. पवार यांचेकडे दिलेला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.बी. पाटील यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर प्रभारी कुलसचिवपदाचा चार्ज आर.एल. शिंदे यांचेकडे देण्यात आला आहे.

कुलसचिव हे विद्यापीठातील महत्वाचे पद असतांना किती दिवस प्रभारी पद ठेवणार? परीक्षा नियंत्रक म्हणून पूर्णवेळ असलेले डॉ. बी.पी. पाटील हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात डीनवर गेले असल्याने ती जागा रिकामी झाली. त्या जागी मॅथेमॅटिक्स विभागाचे प्रा. किशोर फकिरा पाटील यांचेकडे परीक्षा नियंत्रक पदाचा प्रभारी चार्ज देण्यात आलेला आहे. 7-8 महिने झाले पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक म्हणून विद्यापीठाला लाभलेला नाही. विदयापीठाचे वित्त अधिकारी श्री. कराड यांचेनंतर अद्याप पूर्णवेळ वित्त अधिकारी नाही. मध्यंतरी प्रा. विवेक काटदरे यांचेकडे प्रभारी चार्ज होता. त्यानंतर मधुलिका सोनवणे यांचेकडे प्रभारी चार्ज होता. मधुलिका सोनवणे यांनीही दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला असल्याने वित्त अधिकारी म्हणून आता कुणाकडे प्रभारी चार्ज दिला जातोय याची प्रतिक्षा आहे.

एकंदरीत कुलगुरू प्र. कुलगुरू, कुलसचिव परीक्षा नियंत्रक, वित्त अधिकारी महत्वाची पदे अद्याप पूर्णवेळ भरलेले नाही. वरील सर्व पदावर प्रभारी राज चालू आहे. त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दैनंदिन कामकाज आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याने हे विद्यापीठाचील प्रभारी राज केव्हा संपेल याची प्रतिक्षा सर्वच जण करताहेत. असेच चालू राहील तर देशातील विद्यापीठांमध्ये जे रॅकिंग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला मिळाले आहे ते रॅकिंग घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.