एका रात्रीत चंद्राबाबू नायडू यांचा बंगला केला जमीनदोस्त !

0

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ‘प्रजा वेदिका’ हा अलिशान बंगला रातोरात पाडण्यात आला आहे. आतापर्यंत या इमारतीत चंद्राबाबू राहत होते. काही दिवसांपूर्वीच चंद्राबाबूंनी मुख्यमंत्री रेड्डी यांनी पत्र लिहून ही इमारत पाडू नये व या इमारतीस विरोधी पक्ष नेत्याचे शासकीय निवासस्थान घोषित करावे, अशी मागणी केली होती. दरम्यान टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी या तोडकामास जोरदार विरोध केला. तरिदेखील तोडकाम थांबवण्यात आले नाही. एक जेसीबी, सहा ट्रक आणि 30 कामगारांनी तोडकाम पूर्ण केले. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सोमवारी जगनमोहन रेड्डींनी याच इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची घोषणा केली होती.

“प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती.” त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई केल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे. दरम्यान रेड्डींच्या या निर्णयाला टीडीपीने “राजकीय द्वेषातून केलेली कारवाई” म्हटले आहे.

प्रजा वेदिका इमारतीची उभारणी आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणाद्वारे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या रूपात करण्यात आली होती. यासाठी तब्बल पाच कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. चंद्राबाबू नायडू या ठिकाणीच पक्ष नेत्यांच्या बैठकी घेत असत.

Leave A Reply

Your email address will not be published.