उमेदवार – …तर भाजपाकडून जळगावसाठी भाविनी पाटील उमेदवार?

मंत्री गिरीश महाजनांचा पुढाकार महत्त्वाचा : भाजप धक्का देण्याच्या तयारीत

0

दीपक कुळकर्णी
जळगाव ;- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्र वगळून 195 उमेदवारांची नावे जाहीर केल्याने इच्छुक उमेदवारांच्या नजरा दिल्लीकडे लागून आहेत. बहुतांश विद्यमान खासदारांना नारळ दिला जात असतांना तोच कित्ता जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गिरविला जावू शकतो. भाजप धक्कातंत्राचा वापर करीत असून दुसरी यादी जाहीर करतांना अनेक नवखे उमेदवार असू शकतात. त्यातच जळगावसाठी मोहाडी, ता. जामनेर येथील माजी सरपंच भाविनी पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील माजी सरपंच व नवसारी खासदार सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी विचार करु शकतात. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी.आर. पाटील हे कन्येच्या उमेदवारीबाबत श्रेष्ठींना गळ देखील घालू शकतात. खासदार पाटील यांनी पुढाकार घेतला आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दुजोरा दिला तर भाविनी पाटील यांचा मार्ग मोकळा होवू शकतो. युवा सरपंच म्हणून भाविनी पाटील यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे. भाजपात सक्रिय असलेल्या भाविनी पाटील या समाजकार्यातही अग्रेसर आहेत.

गुजरात जिंकण्यामध्ये सी.आर. पाटील यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या कन्या आता जळगावातील निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. गत काळात भाविनी पाटील यांनी मोहाडी गावात ग्रामविकास पॅनल उभे करुन एकहाती सत्ता स्थापन केली होती.

भाविनी पाटील यांनी मोहाडी गावच्या सरपंच म्हणून कारभार पाहिला आहे. त्यांच्या काळात ग्रामविकासाचे चांगले कार्य झाले आहे. परिसरात दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. खासदार सी.आर. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राऊट येथील मूळचे रहिवासी आहेत. प्रांतरचनेत महाराष्ट्र आणि गुजरात राज्य निर्माण झाल्याने पाटील यांचे कुटुंबीय गुजरातला रवाना झाले.

तेथे पोलीस दलात कार्यरत असलेले श्री. पाटील राजकीय क्षेत्रात आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत सी.आर. पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सी.आर. पाटील यांच्या दोघी कन्या या खान्देशात असून दोघीही राजकारणात सक्रिय आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे सूत्र अवलंबिले असून काही विद्यमान खासदारांसाठी ‘वेगळी’ जबाबदारी निश्चित केली जात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी महिला उमेदवार असावा अशीही चाचपणी सुरु असून त्या दृष्टीकोनातून काही नावांवर चर्चा होत आहे. माजी आमदार स्मितातार्इ वाघ यांच्या नावावर चर्चा होत असतांना खासदार सी.आर. पाटील यांच्या कन्येचे नाव पुढे येत आहे.

महाजनांचा पुढाकार आवश्यक
भाविनी पाटील या मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील असून ते रावेर लोकसभा क्षेत्रात येतात. मात्र पक्ष दमदार उमेदवाराचा शोध घेत आहे. भाविनी पाटील यांच्या नावावर चर्चा सुरु झाली असली तरी त्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचा पुढाकार आवश्यक आहे. खासदार सी.आर. पाटील हे कन्येसाठी शब्द टाकतीलही मात्र त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हिरवा झेंडा महत्त्वाचा आहे.

‘‘मी भारतीय जनता पक्षात कार्यकर्ती म्हणून काम करीत आहे. पक्ष देर्इल तो आदेश पाळणे हे माझे कर्तव्य आहे. मोहाडीची सरपंच असतांना केलेल्या कामाबद्दल समाधान आहे. अनुभव कमी असल्याने या पदासाठी विचार होर्इल असे वाटत नाही मात्र पक्ष पातळीवर काय होते ते पाहू!
-भाविनी पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.