आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरु

0

मुंबई :  देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती थांबायचं काही नाव घेत नाहीत. आज सलग दुसऱ्या दिवशी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. आज रविवारी पेट्रोल दरात ३५ पैसे आणि डिझेल दरात २४ पैसे वाढ करण्यात आली.

आज रविवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०४.६२ रुपयांपर्यंत वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९८.५२ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा ९९.५५ रुपये इतका भाव वाढला आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९८.३६ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०६.७७ रुपये आहे.

मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९६.४८ रुपये झाला आहे. मुंबईत डिझेलला शंभरी गाठण्यासाठी अवघी साडेतीन रुपयांची तफावत आहे. जाणकारांच्या मते, दरवाढीचा सपाटा असाच सुरु राहिला तर लवकरच डिझेल शंभरी गाठेल. दिल्लीत डिझेल ८८.९५ रुपये आहे. चेन्नईत ९३.१५ रुपये आणि कोलकात्यात ९१.८० रुपये डिझेलचा भाव आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.६७ रुपये झाला आहे. आजच्या घडीला देशातील सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.

कंपन्यांनी काल शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ केली होती. मागील दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल ३२ वेळा इंधन दरवाढ केली आहे. या दरवाढीने पेट्रोल ८.१४ रुपयांनी महागले आहे. तर याच कालावधीत डिझेल ८.११ रुपयांनी महागले आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील तेजी कायम आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.६२ डॉलरने वाढला आणि तो ७६.१८ डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.७५ डॉलरने वधारला आणि ७४.०५ डॉलर प्रती बॅरल झाला होता. देशातील इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळला आहे. मे महिन्यात घाऊक आणि किरकोळ महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. इंधन दरवाढीने बहुतांश शहरात पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर चौफेर टीका केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.