अमरावतीच्या कन्येचं मोठे धाडस; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणलं

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रविवारी तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. आता अफगाणिस्तानचे उप-राष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी स्वत:च्या नावाची घोषणा अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून केली. तालिबानमुळे अफगाणिस्तानमध्ये अराजकासारखी स्थिती आहे. अन्य देशांप्रमाणे भारत सरकारनेही अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्यांना भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशात आणले.

अफगाणिस्तानमध्ये असलेल्या १२९ भारतीय प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे भारतात परतले. या विमानात अमरावतीची श्वेता शंके ही हवाई सुंदरी होती. तिने धाडस दाखवून आपलं कर्तव्य बजावत संपूर्ण परिस्थिती हाताळत प्रवाशांना मायदेशी परत आणले आहे.

अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या १२९ भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं एआय- २४४ या विमानाने काबुल विमानतळातून बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करत व त्यांना मार्गदर्शन करीत आपल्या मायदेशी आणले.

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान पाठवण्यात आले होते. मात्र, काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानला उतरण्याची परवानगी दिली जात नव्हती. एकीकडे तालिबानचे सावट, अपहरणाची शक्यता तसेच आकाशात १२ घिरट्या घालून इंधन संपण्याची भीती या सर्व संकटाच्या परिस्थितीत एअर इंडियाचे विमान काही वेळानंतर काबुल विमानतळावर उतरले आणि अफगाणिस्तानातील नागरिक व अधिकाऱ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान भारतात सुखरूप परतले. यावेळी हवाई सुंदरी असलेल्या श्वेता शंकेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धैर्याने आणि प्रवाशांना धीर देत मार्गदर्शन केले. एअर इंडिया विमानात कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्राच्या श्वेता शंकेच्या कामगिरीचे सध्या देशात कौतुक केले जात आहे. तिच्या आई वडिलांना श्वेताचा सार्थ अभिमान वाटतोय. श्वेता ही अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये असलेल्या बाभळी येथील शिवाजी चौकात राहते. अफगाणिस्तानातून भारतीयांना सुखरुप परत आणणारी ‘निरजा’ श्वेता हिच्याशी महाराष्ट्राच्या मंत्री यशोमती ठाकूरांनी संवाद साधला. ताई, बाहेर गोळ्यांचे आवाज येत होता. पण आम्ही मोहिम फत्ते केली, असे श्वेताने यावेळी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.