अनिल देशमुखांना शोधण्यासाठी ईडीने मागितली सीबीआयची मदत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी  ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरहजर  राहिले आहेत. तसेच त्यांचा कुठेच ठावठिकाणाही लागत नाहीय. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे.

या प्रकरणी देशमुख यांच्या  केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्राथमिक चौकशी अहवाल (पीईआर) फोडल्याप्रकरणी त्यांचे वकील आनंद डागा व सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांना दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. सीबीआयने या दोघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. तिवारी हे वकील डागा यांच्या संपर्कात होते. त्यांच्यातील संभाषण हाती लागल्याने व पुरावे मिळाल्यावर या दोघांनाही अटक केल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

अनेकदा नोटीस बजावूनही ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची भूमिका अनिल देशमुख यांनी घेतली आहे. यामुळे आता ईडी आणि सीबीआय दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी देशमुखांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे.

अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, सीबीआय, ईडीकडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे सहाय्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये, यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे. आता देशमुख हे गायब झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.