राज्यात ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची गरज

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोनच्या आहारी जातांना दिसत आहे. यामुळे अनेक तरुण ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात सापडत आहेत. विद्यार्थी, नोकरदार आणि काही व्यावसायिकही ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेले आहेत. नागपुरातील सायबर पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आहे. काही तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत आल्या आहेत. पण कायद्यानं बंदी नसल्याने हा ऑनलाईन जुगार सर्रास सुरु आहे, यात दिवसेंदिवस तरुण पिढी अडकत चालली आहे.

यामुळे  तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. या ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

“अनेक तरुण ऑनलाईन जुगाराच्या आहारीत गेले आहेत. पैसै हरल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्यही येत आहे, काही जण तर आत्महत्येपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनीही केली आहे.

कर्नाटक सरकार आजपासून (13 सप्टेंबरपासून) सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारा कायदा आणत आहेत, त्यामुळे कर्नाटक सरकार करु शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा प्रश्नही त्यानिमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान, या कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. बंदी असूनही कर्नाटकात कोणी ऑनलाईन जुगार खेळताना, त्याला प्रोत्साहन देताना सापडल्यास कडक कारवाई होऊ शकते.

ऑनलाईन जुगार बंदी करणारे तेलंगणा पहिलं राज्य

देशात ऑनलाईन जुगारावर बंदी नाही. मात्र 2017 मध्ये कायद्याने ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरले होते. आतापर्यंत केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांनी केवळ गेल्या एका वर्षात ऑनलाईन जुगारावर बंदी आणण्यासाठी कायदे आणि सुधारणा आणल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.