हद्दपारीच्या आदेशाला कागदोपत्रांची किनार

0

आपल्या परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, त्याला कसलेही गालबोट लागता कामा नये. विशेषत: प्रत्येक जिल्ह्यात कसलीही जातीय तेढ निर्माण होऊ नये. जातीय तणाव निर्माण होऊ नये यासाठी अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर पोलिसांच्या आवाहनानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने काही ठराविक कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश पारीत केले जातात. विशेषत: सण उत्सवाच्या कालावधीत अशा गुंड प्रवृत्तीकडून गालबोट लागून शांततेचा भंग होऊ नये म्हणून या काळात त्यांना जिल्ह्यात राहण्यास मज्जाव केला जातो. तथापि अशा हद्दपार गुंडांवर करडी नजर ठेवण्यास पोसि अपुरे पडतात किंवा कानाडोळा केला जातो. त्याचा फायदा गुंड व्यक्तीकडून घेतला जातो. जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतर हे गुंड शेजारच्या जिल्ह्यात राहून रात्री पोलिसांची नजर चुकवून किंवा आपल्या राज्यातून हद्दपार केल्यास शेजारच्या राज्यात राहून रात्री आपल्या राज्यात येऊन रात्रीचा उपद्व्याप करतात. याबाबतीत अनेक वेळा वृत्तपत्रातून अशा बातम्या प्रसिध्द झालेल्या वाचनात येतात.

जळगाव जिल्ह्यातून भुसावळ येथील एका गुंडाला जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यात हद्दपार केल्याचे आदेश पारित झाले होते. तथापि निवडणुकीचा निकाल लागला अन्‌ त्यानंतर जी जल्लोषात निवडणुकीच्या विजयाची मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीत हद्दपार व्यक्ती सामील झाला होता. एवढेच नव्हे तर विजयी उमेदवारांच्या उघड्या मोटारीतून जी मिरवणूक काढण्यात आला त्या विजयी उमेदवारात त्या हद्दपार व्यक्ती होता हे छायाचित्रासह वृत्तपांनी छापले होते. सांगण्याचे तात्पर्य हद्दपार झालेली ती व्यक्ती त्या मिरवणुकीत आली कशी? आली तर तातडीने पोलिसांनी त्यावेळी त्यांचेवर कारवाई का केली नाही? कारवाई न करण्याचे कारण काय? मग ही हद्दपारी कागदोपत्रीच आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत होतात. कारण जळगाव जिल्ह्यात चार वर्षात एकूण 124 जणांनी हद्दपारीचे आदेश मोडले म्हणून त्यांचेवर गुन्हे दाखल दाखल झाले आहेत. पोलिसांना हे सापडले म्हणून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली. परंतु पोलिसांना चकवा देऊन जेे जिल्ह्यात येताता. त्यांचे बाबतीत काय? अशा कृत्यामुळेच छुपेपणाने ताणतणाव निर्माण होतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसे अंत्यंत चलाख, असतात. त्यामुळे हद्दपारीच्या आदेशाचे उल्लघन झाल्यास त्यांच्यावर आणखी कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तरच सर्व उत्सव अत्यंत गुण्यागोविंदाने साजरे होतील.

जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे हे कडक शिस्तीचे भोगते म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यातून हद्दपार आणि जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आलेला आरोपी जिल्ह्यात दिसला रे दिसला की त्याचेकडे कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यापुढे अशाप्रकारे नियमांचा भंग झाला तर गुन्हेगारी आणि गुंडगिरी ठेचण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांचे याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. जळगाव शहरात एका सहाय्यक पोलिसाच्या सेवानिवृत्तीनंतर समारंभात एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर जळगाव शहर पोलिस शहर पोलिस स्टेशनचे पाच पोलिस कर्मचारी डान्स केल्याचे वृत्त फोटोसह सोशल मिडीयावर व्हायरला झाला होती. हे वृत्त व्हायरल झाला तेव्हा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे हे मुंबईला मिटींग निमित्त गेलेले होते. ते जळगावला येताच त्या गुंडाबरोबर डान्स करणाऱ्या पाच पोलिसांवर कारवाई केली. त्यांची तडक कंट्रोलरूमध्ये बदली केली. त्यामुळे समाजात एक चांगला संदेश गेला कारण अशी गुंडागिरी करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांना या ना त्या माध्यमातून खुश करता व त्यातून आपला स्वार्थ साधतात. पोलिस अधिक्षक डॉ. मुंडे यांचे त्यांनी केलेल्या कारवाईचे सुध्दा हिंदुच्या सणाचे दिवस सुरु झाले आहेत. गणेशोत्सव सुरु असून त्यानंतर नवरात्रोत्सव लागोपाठ दिवाळीचा सण येतो. सर्व सामान्य हिंदु मुस्लिमांच्या मनात एकोपा असतो. परंतु हे गुंड लोक आगीत तेल ओतात. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढणे आवश्यक असते. अशा गुंडप्रवृत्तीच्या घुसखोरीमुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. म्हणूनच हद्दपार गुंडाविरुध्द कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.