विषारी दारू प्यायल्याने तरूणाला रक्ताच्या उलट्या; दारू विक्रेता महिला ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील तरूणाने विषारी दारू पिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ होवून रक्ताच्या उलट्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहरातील प्रविण पार्क रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी असलेला तरुण अमर रमेश भोळे (वय ३२) हा आई, भाऊ आणि वहिनीसह वास्तव्याला आहे. हा तरुण मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह भागवतो. १६ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अमर हा दारू पिण्यासाठी गेला. त्याठिकाणी प्रकाश नावाच्या मुलाने मोहाची दारू आणल्याचे सांगितले.

अमरने मुलाकडून पुष्पा ठाकूर यांच्या घरासमोर दारूच्या बाटलीत मोहाची दारू दिली. या बाटलीतील दारू अमर याने पिल्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे अमर हा घरी लागलीच निघून आला. पुन्हा त्याला रक्ताच्या उलट्या झाल्याने त्याचा भाऊ राहूल भोळे याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असून आता प्रकृती बरी आहे.

याबाबत अमर भोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विषारी दारू दिल्याप्रकरणी महिला पुष्पा ठाकूर आणि प्रकाश (पुर्ण नाव माहित नाही) रा. सुप्रीम कॉलनी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, सुधीर साळवे, सतीश गर्जे, दत्तू बडगुजर, मंदा बैसाने यांनी संशयित आरोपी महिलेला ताब्यात घेतले. या महिलेविरोधात यापुर्वी दारूबंदीचे तीन गुन्हे एमआयडीसी पोलीसात दाखल आहेत. बुधवारी महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी दिली आहे. सरकारतर्फे स्वाती निकम यांनी काम पाहिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.