थंडीचा कडाका ! रब्बी पिकांना फायदा तर केळीला मोठा धोका

0

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

साकळीसह मनवेल, थोरगव्हाण, शिरागड परिसरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढलेला असून रात्रीच्या वेळी अति थंडी पडत आहे. वाढत्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. या वाढत्या थंडीमुळे रब्बी पिकांना फायदा होणार असून केळी बागांना मात्र मोठा धोका निर्माण होणार असून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून साकळीसह परिसरात मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका वाढलेला असून दिवसभर वातावरणात थंडीने हुडहुडी जाणवत आहे. रात्रीच्या वेळी थंडीचे प्रमाण जास्त असून जीवघेणा अशा कडाक्याच्या थंडीचा जोर जाणवत आहे. थंडीमुळे रात्रीच्या वेळी सात वाजेपासूनच गावातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. कामाव्यतिरिक्त कोणीही घराच्या बाहेर दिसत नाही. रात्रीच्या वेळी थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटवून व गर्मीचे कपडे घालून कडाक्याच्या थंडीपासून नागरिक आपल्या शरीराचा बचाव केला जात आहे. या वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला असून लहान मुले, महिला, वयोवृद्ध, रुग्ण यांना थंडीचा खूप त्रास जाणवत आहे. तसेच थंडीमुळे आजारांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. यंदा पावसाचे प्रमाणही चांगले होते. त्यानुसार येत्या काळातही परिसरात थंडीचा जोर वाढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

केळी पिकाचे नुकसान

सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांना फायदा होणार आहे. तर केळी पिकांच्या बाबतीत थंडी नुकसानकारक ठरत आहे. या थंडीमुळे केळी बागांच्या वाढीवर तसेच निस्सवण्यावर सुद्धा खूप मोठा परिणाम होणार आहे. तर अति थंडीमुळे काही ठिकाणी केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. एकूणच परिसराचे मुख्य पीक समजले जाणारे केळी पिकाला अति थंडीचा धोका निर्माण झाल्याने केळी बागांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अतिथंडीमुळे रात्रीच्या वेळी शेती कामे करणेही जिकरीचे बनले आहे.

शेकोटीजवळ राजकीय गप्पा

साकळीसह परिसरात थंडीचा जोर वाढल्याने रात्रीच्या वेळी गावात अनेक ठिकाणी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहे. साकळी गावात ग्रामपंचायतच्या तसेच जि.प. व पं.स. यांच्या हंगामी निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने शेकोट्यांच्या ठिकाणी राजकीय चर्चा रंगू लागलेले आहे. गावात कोण कोण उभे राहू शकत ? ग्रामपंचायत निवडणुकीत किती पॅनल निवडणुका लढवतील ? कोणत्या पॅनलचा प्रभाव किती व कसा राहील ? कोणता राजकीय व्यक्ती प्रभावशाली राहील ? अशा प्रकारच्या चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. त्यामुळे ऐन थंडीतही राजकीय वातावरण मात्र तापू लागलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.