हे चाललंय काय ? पुन्हा शिवशाहीला आग ! आता तब्बल ४२ प्रवासी…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नाशिकहून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसने सिन्नरलगतच्या माळवाडी शिवारात सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मात्र चालकाने प्रसंगावधनता दाखवत बस रस्त्याच्या बाजुला लावली आणि सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरविले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर काही वेळात बस अक्षरशः भस्मसात झाली. या घटनेमुळे शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिनाभरापूर्वी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील खासगी प्रवासी बस आणि डंपर यांच्या अपघातात बसला आग लागून १३ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना प्रवासी बसने पेट घेण्याची ही दुसरी घटना घडली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावलेसिन्नरच्या माळवाडी शिवारापर्यंत बस गेली असताना मागील बाजूने धूर निघू लागला. मागून येणाऱ्या अन्य वाहनधारकाने त्याबाबत माहिती दिल्यावर चालक अमित खेडेकर (४१) यांनी बस रस्त्याच्या कडेला नेऊन उभी केली. प्रवाशांना तातडीने बसमधून खाली उतरण्यास सांगितले. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन पाच ते सहा मिनिटांत सर्व प्रवासी खाली उतरले. काही वेळात बस आगीच्या विळख्यात सापडली. धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर नगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु, तोपर्यंत बस पूर्णत: खाक झाली होती. केवळ तिचा सांगाडा शिल्लक राहिला. आगीमुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. बसला लागलेल्या आगीचे रौद्ररुप पाहून सुखरूप बचावलेले प्रवासी धास्तावले. या ४२ प्रवाशांना मागून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाहीमधून पुण्याकडे मार्गस्थ करण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सिन्नरजवळ पेटलेली शिवशाही बस पुणे आगाराची होती. तिला आग कशी लागली, याची चौकशी सुरू असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारणांची स्पष्टता होईल. जळालेल्या बसला आगारात आणून तिची तपासणी केली जाईल. नाशिक जिल्ह्यात एकूण ५६ शिवशाही बस आहेत. शिवशाही बसच्या दररोज, साप्ताहिक आणि दोन महिन्यातून एकदा अशा तीन तपासण्या स्थानिक कार्यशाळेत केल्या जातात. अन्य आगारातून येणाऱ्या शिवशाही बसची मूळ जिल्ह्याच्या कार्यशाळेत तपासणी होते – अरुण सिया (विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ)

Leave A Reply

Your email address will not be published.