हे काय ? कडाक्याच्या थंडीत जोरदार पावसाचा इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात प्रचंड बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे अवकाळी पाऊस. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  एल-निनोच्या प्रभावामुळे वातावरणात असाच बदल होत राहिल.  सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आली असली, तरी काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्याच्या थंडीला सुरुवात झाली असली तरी, यावर्षी देशात थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. सध्या दिवसा थंडी वाजत असून, त्यामानाने पहाटेचा गारवा कमीच राहणार आहे, पुढील काही दिवस देशात असंच वातावरण राहणार असल्याचंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश राज्यांच्या कमाल आणि किमान तापमानात सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत मागील दोन दिवस सर्वात थंड होते. १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण उत्तर भारताच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची आणि तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दुसरीकडे सिक्कीममध्ये १२ डिसेंबरला काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिणी तामिळनाडू, दक्षिणी केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदललं होतं. पण, आता पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.