जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
आजपासून पुढील तीन दिवस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या ४ जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. याशिवाय हवामान खात्याने मुंबई, पुणे, ठाण्यासह २६ जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.