‘केळी’वर सी.एम.व्ही.चा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

बनावट कागदपत्रे दाखवून १ कोटीची फसवणूक करणाऱ्याला अटक

0

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर तालुका हा केळी चे आगार म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्ह्यातील एक द्वितीयांश केळी एकटा रावेर तालुका पिकवतो परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून या तालुक्यातील प्रसिद्ध केळीला CMV अर्थात कुकुंबर मोजाक व्हायरस..! नावाचे ग्रहण लागलेले दिसत आहे. जून,जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये केळी लागवड केल्यास हा व्हायरस प्रत्येक वर्षी येतोच आणि शेकडो एकर वरील हजारो लाखो केळीचे रोप व केळीचे खोड शेतकऱ्यांना कापून फेकावे लागतात. याही वर्षी हा व्हायरस केळीवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी जून महिन्याच्या लागवडीपासून आजपर्यंत चार महिन्यांची केळी शेतकऱ्यांनी उपटून फेकलेली दिसत आहे. काही ठिकाणी दोन महिन्यांची केळी परिसरात उपटून फेकण्याची वेळ आलेली आहे. या केळी पिकावर आजपर्यंत झालेला खर्च म्हणजे 15 रुपये प्रमाणे केळीचे रोप विकत घेणे. त्याचे चार महिन्यापर्यंत संगोपन करणे तसेच त्याला शेणखताचा रासायनिक खताचा डोस देणे व या कामी लागणारी मजुरी इतका खर्च शेतकऱ्याने केलेला आहे. परंतु ज्या वेळेस ही केळी उपटून फेकण्याची वेळ येते त्यावेळेस त्या शेतकऱ्याला किती दुःख होत असेल याची कल्पना न केलेली बरी. परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यावर असे दिसून आले की प्रत्येक वर्षी हा व्हायरस जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये हमखास येतोच त्यामुळे शासनाने व कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांची भावनिक मागणी आहे.

शेतकऱ्यांनी दै. लोकशाहीला दिलेल्या प्रतिक्रिया

अभिमान तुकाराम बोदडे रा.मोरगांव ता.रावेर. जि.जळगांव. मी जुलै महिन्यामध्ये जैन कंपनीचे G-9 जातीचे 3500 रोप बुकिंग केलेले होते. मागील वर्षी जून महिन्यात केलेल्या लागवडीवर CMV व्हायरस आल्यामुळे मी यावर्षी जुलै महिन्यांमध्ये केळी रोपांची लागवड केली परंतु याही वर्षी माझे सीएमव्ही व्हायरस मुळे जवळजवळ 2500 केळी रोप वाया गेलेले आहे आजपर्यंत त्या केळीच्या रोपांवर रासायनिक खताचे दोन डोस तसेच चार वेळा ड्रिंचिंग तसेच तीन वेळा फवारणी व दोन वेळा पोंगे भरणे केलेली आहे आजपर्यंत मी सर्व केळी बागेवर जवळजवळ एक लाख दहा हजार रुपये खर्च केलेला आहे. अजूनही पुढे काही सांगता येत नाही राहिलेल्या केळीच्या रोपांना सुद्धा सीएमव्ही व्हायरसचा अटॅक होऊ शकतो. एकंदरीत म्हणजे केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनाने संबंधित विभागांना योग्य ते मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावे अशी आमची अपेक्षा आहे.

 

गोपाल रघुनाथ पाटील. रा.मोरगांवखु.ता.रावेर .मी जूनमध्ये राईज अँड शाईन या कंपनीचे G-9 या जातीचे सुमारे 4000 केळीची रोपे लागवड केलेली होती. त्या रोपांना शेणखताचा डोस तसेच दोन वेळा ड्रिंचिंग तसेच दोन वेळा पोंगे भरणी केली होती. रासायनिक खतांचे डोस एक लागवडीपासून एक एक महिन्याच्या अंतराने दिलेले होते. आज पर्यंत माझा या केळी रोपांवरती एक लाख 25 हजार रुपये खर्च झालेला आहे परंतु या सी एम व्ही व्हायरस मुळे नाईलाजाने मला संपूर्ण उभी केलेली चार महिने वयाची केळी कापून फेकावी लागत आहे. तसेच या ठिकाणी आता जवळ असलेल्या केऱ्हाळे गावाहून. नवीन केळीचे कंद आणून लागवड करावी लागत आहेत. जर असेच सुरू राहिले तर रावेर तालुक्यात केळीची लागवड येणाऱ्या काळात नक्कीच कमी होण्याची शक्यता आहे. यावर कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठ व शास्त्रज्ञ यांनी काहीतरी संशोधन करावे अशी अपेक्षा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.