विवेकानंद विद्यालयात दुर्गुणांची होळी साजरी करून समाजप्रबोधन

0

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील विवेकानंद विद्यालयात होळी या सणानिमित्त माध्यमिक विभागाच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी व काही उपक्रशील शिक्षकांनी शाळा व सभोवतालच्या आवार परिसरातील मोठ्या प्रमाणात पसरलेला प्लास्टिक घनकचरा , पालापाचोळा , प्रदूषक घटक , युज अँड थ्रो मटेरियल इ. गोळा करून परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी देखील खराट्याने शाळेच्या सर्वच परिसरातील केरकचरा झाडून गोळा केला. सभोवताली विद्यार्थिनींनी सुबक रांगोळीचे रेखाटन केले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्यातील दुर्गुण जसे आळस , खोटं बोलणे , अस्वच्छता , काम , क्रोध , मोह , मत्सर , मुक्या पशु पक्ष्यांना त्रस्त करणे , टोमणे मारणे , पर्यावरणाबद्दलची उदासीनता , बरे वाईट बोलणे इ. विषयी सूचक पोस्टर्स द्वारे माहिती दिली व त्यानंतर या दुर्गुण दर्शक पोस्टर्सचे केरकच-याच्या होळीत दहन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी ” स्वच्छ शाळा , सुंदर शाळा ” चे महत्व विशद केले.
रंगपंचमी खेळताना विद्यार्थ्यांनी रासायनिक रंगांचा वापर न करता इको फ्रेंडली रंग वापरावेत , तसेच पाण्याचा अपव्य देखील टाळावा , असे आवाहन केले.
उपमुख्याध्यापक व स्काऊट गाईड विभागाचे प्रमुख पवन लाठी यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील होळी या सणाची आध्यात्मिक महती , ऐतिहासिक प्रसंग
व विविध राज्यात होळी सणाची पद्धती या विषयी माहिती देऊन आपल्या व्यक्तीत्वातील सद्गुणांचा विकास करून दुर्गुण कमी करावेत , दुर्गुणांची होळी करावी याविषयी आवाहन केले. कलाशिक्षक राकेश विसपुते व क्रीडाशिक्षक विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोस्टर्स व घोषणा देऊन हा कृतीयुक्त संकल्प पालन करण्यासाठी प्रेरित केले.
विद्यार्थ्यांनी देखील सर्व शिक्षकांच्या संदेशाला एक मुखाने प्रतिसाद देऊन संकल्प तडीस नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

नवोपक्रम यशस्वीतेसाठी यावेळी विद्यालयातील शिक्षक संदीप कुलकर्णी , हेमराज पाटील , प्रसाद वैद्य , शिक्षिका सरला शिंदे , नूतन अत्तरदे , कर्मचारी वैशाली जाधव , देविदास गोसावी, गणेश सोनार , राजू गोसावी , प्रकाश जाधव , गोपाल धनगर , नितीन साळी यांनी सहकार्य केले.

काळाची गरज ओळखता घेतलेल्या या नवोपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार , संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर , उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन , सहसचिव डॉ. विनीत हरताळकर आदींनी मुख्याध्यापक नरेंद्र भावे , उपमुख्याध्यापक श्री पवन लाठी , उपस्थित शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.