जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील एका दुकानाचे वीजमीटरच चोरट्यांनी चोरून नेले. या दुकानाचे गेल्या सहा महिन्यांपासून वीजबिल येत नाही, म्हणून सुरेखा प्रमोद बऱ्हाटे (वय ५२, रा. सूर्या अपार्टमेंट, पिंप्राळा)यांनी मीटर रूममध्ये जाऊन पाहणी केली असता, त्यांना मीटर दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी महावितरण कंपनीत जाऊन चौकशी केली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तुमचे मीटर आम्ही काढलेले नाही, ते जागेवरच असेल, असे सांगितले.
त्यावरून वीजमीटरची चोरी झाल्याचे लक्षात आले. सुरेखा बऱ्हाटे यांनी बुधवारी (ता. २२) दुपारी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक प्रदीप पाटील तपास करीत आहे.