काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

0

पहूर : – पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या फत्तेपूर दूरक्षेत्राच्या हद्दीतील वाकडी गावात वजन काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यासह ट्रकचालक, दलाल आणि हमाल, मापाडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

वाकडी येथे वडगाव सद्दो येथील कापूस दलाल नाना चिंधू कोळी याच्या मध्यस्थिने विलास देवराम जोशी यांचा ३५ क्विंटल कापूस हा २७ क्विंटल ९० किलो भरला. आनंदा बुढन जोशी यांचा ३० क्विंटल कापूस प्रत्यक्षात २० क्विंटल ४० किलो मोजण्यात आला. गोकुळसिंग राजपूत यांचा ५४ क्विंटल कापूस ४० क्विंटल ८० किलो भरला. तर दगडू हरी लोखंडे या शेतकऱ्याचा कापूस तोल काट्यानुसार १२ क्विंटल मोजण्यात आला होता. मात्र, त्याला तोल काट्यात तफावत असल्याची शंका आल्याने त्यांनी तोल थांबवून मापाऱ्यास रंगेहाथ पकडले.

 

यामुळे शेतकरी संतापल्याने गोंधळ उडाला. याचाच फायदा घेत मापाडी, हमाल यांनी पळ काढला. अखेर शेतकऱ्यांनी कापसासह टूक फत्तेपूर पोलिसांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी दगडू लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कापूस व्यापारी अभिजीत रविंद्र साळुंके (रा.. नकाणेचित्तोड, धुळे) याच्यासह ट्रक चालक सुरेश बुधा मोरे (पारोळा), दलाल नाना चिंधू कोळी (वडगाव सद्दो, ता. जामनेर) तसेच १० हमालांविरूद्ध पहूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पो.नि. सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात हे. कॉ. किरण शिंपी, प्रवीण चौधरी, दिनेश मारवडकर, पो. कॉ. अरुण पाटील, गनी तडवी, राहूल जोहरे, मुकेश पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.