लोकशाही न्यूज नेटवर्क

डोंबिवलीच्या जोंधळे विद्यामंदिर शाळेत एका शिक्षिकेने २० ते २५ मुलांना लाकडी पट्टी, स्टीलच्या पट्टी, व हाताने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत काही मुले जखमी झाले असून, संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पश्चिमेकडील प्रसिद्ध असलेल्या एस एच जोंधळे विद्यामंदिर शाळेत निर्दयीपने शिक्षिकेने मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. निलम भारमळ असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्यांनी पाचवी व सहावीमध्ये शिकणाऱ्या 20 ते 25 विद्यार्थ्यांना लाकडी, स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत काही मुले जखमी झाली व त्यांच्या अंगावर मारहाण केल्याच्या जखमा आढळल्या आहे. विशेष म्हणजे निलम भारदळ या तीन ते चार दिवसांपूर्वीच या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या. या घटनेनंतर सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. शिक्षिका नीट शिकवत नसल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वी पालकांनी शाळेकडे केली होती. याचाच राग मनात धरून विद्यार्थ्यांना मारल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचाही इशारा पालकांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी शाळा प्रशासनाने “आम्ही पालकांची माफी मागतो, पुढे अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घेऊ, संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे.

