जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश

0

जळगाव ;- भाजपकडून उन्मेष पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असून उद्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी १२ वाजता उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत पारोळा माजी नगराध्यक्ष करणं पवार ,अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी,  हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . दरम्यान, यानंतर जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. ते म्हणाले की, खासदार उन्मेष पाटील यांच्यावर अन्याय झाला असून या संदर्भातील माहिती त्यांनी स्वत: उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना दिली आहे. याप्रसंगी विस्तृत चर्चा झाली असून या संदर्भात आज सायंकाळी अथवा उद्या प्रवेश होणार असल्याचे संजय सावंत म्हणाले.

उन्मेष पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

खा. उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत. त्यांनी याआधी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न देता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती. याच नाराजीतून त्यांनी आज ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे. ठाकरे गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही.

मोदींनी जो विकास केलेला आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी राहील. मी प्रचंड मताधिक्याने निवडून येईन, असा माझा ठाम विश्वास आहे. मोठमोठे भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले तरी आमच्यासोबत मोदी आहेत. विकास कामे आहेत. त्यामुळे त्याचा फरक पडणार नाही”, अशी भूमिका स्मिता वाघ यांनी मांडली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.