युक्रेनमध्ये युद्ध छेडण्याची शक्यता; भारतीयांना मायदेशी परतण्याचे आवाहन

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

युक्रेनमध्ये सध्या प्रचंड अस्थिरतेची स्थिती असून रशियाकडून युद्ध छेडलं जाण्याची दाट शक्यता असल्याचा दावा खुद्द युक्रेनकडूनचं करण्यात आला आहे.

यापार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या भारतीयांना सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतावं अस आवाहनं भारतीय दुतावासानं केला आहे. यासाठी दुतावासानं भारतीयांसाठी संदेशही जाहीर केला आहे.

या संदेशपत्रात दुतावासानं म्हटलं की, सध्याची युक्रेनमधील अनिश्चिततेची स्थिती पाहता इथं असलेल्या भारतीय नागरिकांनी विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना इथं राहणं गरजेचं नाही त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात मायदेशी परतावं. त्याचबरोबर भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की युक्रेन अंतर्गत सर्व प्रकारचे अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावेत. भारतीय नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी युक्रेनमधील त्यांच्या वास्तव्याबाबत भारतीय दुतावासाला माहिती द्यावी. यामुळं दुतावासाला भारतीयांना सर्व प्रकारची आवश्यक ती सुविधा पुरवण्यात येईल, असंही या संदेशपत्रात लिहिलं आहे.

युक्रेनवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. युक्रेनच्या सीमेवर तब्बल 1 लाख 30 हजार सैनिकांच्या तैनातीनंतर युक्रेननं आपली भूमिका जाहीर केली आहे. रशिया आपल्या देशावर लवकरच हल्ला करण्याच्या तयारीत असून हल्ल्याची तारीख 16 फेब्रुवारी दिल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र, हा आरोप रशियानं पूर्णपणे फेटाळून लावलाय. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं बेलारूसमधील आपल्या नागरिकांना परत येण्यास सांगितल्यामुळं युध्दजन्यस्थिती निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं की, रशिया 16 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करणार असल्याचं समजतंय. यासाठी आम्ही 16 फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करणार आहोत. देशातील नागरिकांना राष्ट्रगीत वाजविणे, देशभरात ध्वज फडकणं व निळ्या-पिवळ्या फिती घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.