श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग- ९

करी लाभेवीण प्रीती

लेंकराचें हित I
वाहे माऊलींचे चित्त IIध्रु II
ऐसी कळवळ्याची जाती I
करी लाभेविण प्रीती II १ II
पोटीं भार वाहे I
त्याचें सर्वस्व ही साहे II२II
तुका म्हणे माझें I
तैसे तुम्हा संता ओझें II३II

अभंग क्रमांक १७३५

खरंतर आपलं आपल्या स्वतःवरच प्रेम असते व या प्रेमातला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपले अस विश्व स्वतःभोवती निर्माण करतो. आपली आई,पत्नी, मुलं, नातवंड या सर्वांवर प्रेम करतो. आपला मित्र परिवार व लोकसंग्रह वाढवितो. दिवसेंदिवस आनंदाचा परिघ वाढत जावा हीच आपली इच्छा असते.

पण ही सारी नाती ‘जन हे सुखाचे I दिल्या घेतल्याचे I’ या प्रकारात मोडतात. काही, बरा चालता धंदा I बहिण म्हणे अरे दादा II अशी वस्तुस्थिती असते आपला भाऊ, मुलगा किंवा पती कर्तुत्ववान असावा अशी प्रत्येक भगिनी वर्गाची इच्छा असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात तसे

“मनासारखी सुंदर ती अनन्या मनासारखे पुत्र जामात कन्या
सदा सर्वदा बोलिती रम्य वाचा
जनी जाणिजे योग हा सकृताचा”

भाग्यानं हे लाभले तर जीवन सुव्यवस्थित व सुसह्य नक्कीच जाते पण ते कृतार्थ कधीच होत नाही. कारण संसार हा सुखदुःख मिश्रितच असतो तो राजकारण करणाऱ्या राजकर्त्याचा असो, धर्मकारण करणाऱ्या धार्मिक व्यक्तीचा असो, समाजकारण करणाऱ्या समाजसेवकाचा असो, शिक्षण देणाऱ्या शिक्षकाचा असो किंवा एखादा भाजीवाला किंवा फळवाल्याचा असो.कुठेही गेले तरी ‘पळसाला पानं तीनच’ असे त्याचे स्वरूप असते. देणं व घेण या गोष्टी प्रत्येक नात्यात घडत राहतात. त्यातला व्यवहार पूर्ण समाधान देणारा ठरतोच असे नाही त्यामुळे थोडं तरी जीवनात न्यूनत्व व कलुशीतत्व इथे दिसतेच.

पण ‘लाभेविण प्रीत’ करणारी एक जातकुळी असते.ती असते संतांची, साधुंची,सद्गुरूंची.” यति कुळ माझे गेले हरपोनी” तिथे जात-पात,पंथ, संप्रदाय, प्रादेशिक विभाग, प्रांत- परप्रांत या गोष्टी आड येत नाही. स्थळ- काळ- त्रिकाळ या सर्वांच्या बंधनापलीकडे जाऊन निव्वळ प्रेम व आनंद देणारा झरा म्हणजे “सद्गुरूची कृपा”.

जी निवृत्तीनाथांच्या सहवासात ज्ञानेश्वर माऊलीला लाभली, जनाबाईला नामदेवाच्या सहवासात लाभली, मीराबाईने कृष्ण प्रेमात रंगून अनुभवली,विठ्ठल भक्तीच्या प्रेमात रंगून गेलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अनुभवली.

जेथे जातो तेथे तू माझा सांगातीI
चालविशी हाती धरूनिया I

त्यांनी आपला सर्व भार विश्वासाने विठ्ठलावरच वाहिलेला आहे. त्यामुळे ‘संतुष्ट हे चित्तI सदासर्वकाळ I’ अशी त्यांची स्थिती झालेली आहे. आपल्या लेकराचे गुण- दोष एका आईलाच ठाऊक असतात. त्याचे हित कशात आहे हे तिला ठाऊक असते. त्यानुसार ती त्याला घडविते. कधी प्रेमाने कधी रागे भरून पण आई लेकराचा हात कधीच सोडत नसते.

तसेच भगवंत,सद्गुरु आपल्या सतशिष्याचा, भक्ताचा हात कधीही सोडत नाहीत. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांचा, दासगणू महाराजांनी अनंतराव आठवले यांचा, सिद्धार्थ स्वामींनी कलावतीआईंचा, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरी माऊलीचा, गोंदवलेकर महाराजांनी परमपूज्य बेलसरे महाराजांचा हात कधीही सोडला नाही अशी अनेक उदाहरणे आहेत. म्हणून लाभाशिवाय प्रीत करणारी ही संतांची मांदियाळी आपल्याला नेहमीच नतमस्तक व्हायला लावेल. “संतांचे पायी हा माझा विश्वास” सर्व भावे दास झालो त्यांचा असे सर्वभावाने आपण संत चरणाशी लागले पाहिजे.

संतांचे अनंत उपकार आपल्यावर असतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात, संत एकनाथ महाराज एकनाथी भागवत या ग्रंथरूपात, रामदास स्वामी दासबोध या रूपात व सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराज गाथेच्या रूपाने आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. निरंतर आपल्याला जागे करत आहेत. उपासना,साधना, भक्ती कशी करावी यासाठी अचूक मार्गदर्शन करीत आहेत. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती होत असतात. “ज्ञानेशो भगवान विष्णू” असंच आपण प्रतिपादतो. त्यांच्या मुखातून अमृतच स्त्रवते . म्हणजे त्यांचे वाड़्मय अक्षय, अद्वितीय, अलौकिक व शाश्वत आनंद प्राप्त करून देणारे असते. आपण ते वाचायला वेळ मात्र काढायला हवा.

देव व सद्गुरू हे दोघेही तितकेच श्रेष्ठ असतात कारण सद्गुरु देवाची भेट करून देतात पण जन्मोजन्मीचे पुण्य फळास आले तरच सद्गुरूची पाऊले त्याचा लाभ होतो पण एकदा का हा लाभ झाला की आपण स्वतःहून दूर जाऊ नये कारण ते आपण ज्या मार्गावरून चालत असतो तिथं आपला कृपाळूपणे सांभाळ करत नेतात एवढेच नाही तर,

भागलिया मज वाहतील कडेI तयांचे नि जोडे सर्व सुख I

इतके ते आपले काळजी वाहतात आपण चुकतो, कधी थकतो, पुन्हा पुन्हा देह बुद्धीवर येतो, कधी तर वाटतं या संसारात भटकंती तर चालू नाही ना पण सद्गुरु कृपाळूपणे स्वीकार करतात विश्वास देतात भार वाहतात,सांभाळ करतात पण आपण ‘सर्वभावे’ दास होणे महत्त्वाचे असते. यातला ‘सर्वभाव’ या शब्दाला योग्य तो न्याय देऊन आपण जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या कनवाळूपणे ते आपल्याला ‘उत्तीर्ण’ करतील यात शंका नाही.

श्रीकृष्ण शरणं मम् ….

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.