श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग- ७

0

अधिकमास विशेष लेख

अभंग – ७

 

परमार्थ महाधन

काळ सारावा चिंतेने Iएकांत वासे गंगास्नानें II
देवाचे पूजने I प्रदक्षणा तुळशीच्या IIध्रु II
युक्त आहार वेहार I नेम इंद्रियाचा सारं II
नसावी वासर I निद्रा बहु भाषण II१ II
परमार्थ महाधन I जोडी देवाचे चरण II
व्हावया जतन I हे उपाव लाभाचे II२II
देह सर्मर्पिजे देवाIभार कांही न घ्यावा I
होईल आघवा Iतुका म्हणे आनंद II३II

अभंग क्रमांक- ९८०

आनंद अवघ्यांनाच हवा आहे. आनंदासाठी सारी धडपड असते. हा अखंड आनंद हवा असतो. दुपारी हवा, रात्री नको असा प्रकार इथे नकोय. पहा ना भाड्याच्या घरापेक्षा स्वतःचे घर अधिक सुख देते. काही काळापुरते बदलीवर लागलेले काम नको असते तर कायमस्वरूपी हवे असते व लवकर प्रमोशन मिळाले तर दुधात साखरच. एकूण सारी धाव आनंदाकडे असते. पण संसारी माणसाच्या हे लक्षात येते की हा आनंद कधी मिळतो तर कधी हातातून निसटतो आणि संतश्रेष्ठ तुकोबाराय तर म्हणतात.

आनंदाच्या कोटी I साठविल्या आम्हा पोटी II

मापता येत नाही इतका अमाप आनंद त्यांना लाभतो का तर भक्तीचे वर्म त्यांना सापडलेले असते. परमार्थच महाधन जवळ असल्याने ते तृप्त असतात आणि सुखाचा सागर असलेल्या देवावर त्यांचा पूर्ण भार असल्याने ते नित्यमुक्त असे असतात. कुठेही शंका, अस्वस्थता, असमाधान, न्यूनता, रिक्तता त्यांच्या आसपासही नसते. जणू ते वैकुंठीचे राजे असतात व आपल्यापुढे लीलाचरित्र करीत असतात.

त्यांच्या आदेशपर अभंगातून आपल्यालाही योग्य दिशा लाभते. युक्तआहारविहारस्य असे गीतावचन सर्वश्रुत आहे. आपला आहार विहार जर संयमीत असेल तर असा योगी परमानंदाला प्राप्त होतो. या अभंगात चिंतन करावे, गंगा स्नान करावे, पवित्र अशी तुळशी, जी संतांची नव्हे सगळ्यांचीच माऊली आहे.

वृंदा वृन्दावती विश्वपुजिता विश्वपावनी
कृष्णसारा नन्दिनी च तुळशीजगतजीवनी

अस स्मरण करून त्या विश्वमाऊलीला आजही आपण वंदन करतो. मनोभावे पूजन करतो. दारात तुळशी वृंदावन करतो व त्या मातेला प्रदक्षिणा ही घालतो. ही आपली संस्कृती आहे.

एकादशी व्रत करावे. काही उपवास करावा. खुप वृथा बडबड करू नये. तसेच एकदम मौनही नसावे. झोप घेऊच नाही असे नाही. सात तास झोप अवश्य हवी, पण खूप निद्रा घेऊ नये. खूप भोजन करू नये. उपाशीही राहू नये. असा सर्वांगाणे समतोल राखावा तर योग व भक्तीच्या मार्गावरून चालणे जमते व या संयमीत जीवनात उपासना घडू शकते अन्यथा नाही.

आयुष्यभर नोकरी- धंदा यातून अर्थार्जन करून काही भाग आपण वृद्धापकाळसाठी कायम ठेव स्वरूपात संचय करून ठेवतो. तसेच परमार्थाचे महाधन हे संचय करून ठेवायचे असते. नित्य साधना, भावपूर्ण जीवन. तुका म्हणे, फार थोडा तरी परउपकार असे ते आचरण जाणीवपूर्वक करावे लागते.

न लागती सायास I
जावे वनांतरा I
सुखे तो घरा नारायण I

किती समृद्ध जीवन संत जगतात त्याची ही प्रचिती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपणही चालावे मग काही तिढा- गुंता राहत नाही.

“मोकळे मन, रसाळ वाणी” असत आपलं व्यक्तिमत्व आपण घडवावे. देवावर सर्व भार सोपवावा म्हणजे आपण उदंड प्रयत्न करावेत. पण नंतर ‘राम कर्ता’ असा भाव असावा. आपण अहंकाराने व मीपणाने जगलो तर कष्ट पदरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. समर्थ रामदास स्वामीही म्हणतात,

मी कर्ता असे म्हणशी I तेणे तू कष्टी होशीI
राम कर्ता म्हणता I पावशी यश,किर्ती, प्रताप II

भगवंताच्या इच्छेविना झाडाचे पानही हालत नाही. विज्ञान कितीही पुढे गेले तरीही कोरोना व्हायरस काळात आपण काय शिकायचे ते शिकलो. म्हणून आपण देवाची चरण कधीच सोडू नये. या आपल्या देहाचा भारही आपण देवावरच सोडावा.

न म्हणा देह माझा I मग भरवसा कैसा I

या देहाचा काय भरोसा आहे हे सर्वांनाच माहित आहे. मग उशीर कशाला करायचा. “सिर सलामत तो पगडी पचास” हे ध्यानात ठेवून आपण नामस्मरणाचा छंद लावून घ्यावा. थोडी थोडी पथ्य सांभाळून वाचन, श्रवण, चिंतन, मनन करून भजन- कीर्तन करीत करीत आनंद अनुभवावा व अवघा आनंद जेव्हा होईल तेव्हा आपण याच्यावत प्राणीमात्रात असलेल्या हरिचे दर्शन घेऊ. मग सहजच ओठी येईल.

आजि सोनियाचा दिनू I वर्षे अमृताचा घनु I
हरि पाहिला रे I हरि पाहिला रे I

श्रीकृष्ण शरणं मम्…..

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे. मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.