श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग – ४

कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता

कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता I
बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा II ध्रूII

कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तांरू I
उतरी पैल पारू भवनदीची II१II

कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन I
सोइरा सज्जन कृष्ण माझा II२II

तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा
वाटे न करता परत जीवा II३II

 अभंग ५१६

जेथे कृष्ण आहे तिथे विजय हा ठरलेलाच असतो. हे गीता वचन सर्वांनाच ठाऊक आहे. कृष्ण म्हणजे साक्षात परब्रम्ह. परित्राणाय साधूनां, धर्म संस्थापनेसाठी कृष्णाचा अवतार झाला. कृष्णलीला अगम्य व अर्तक्य आहे. कृष्णचरित्र वाचन, श्रवण व समजणं अवघड आहे. कृष्णलीला आबालवृद्धांना मोहित करणारी आहे. नव्हे ती वेड लावणारी अशी आहे. संत तुकाराम महाराज हे कृष्ण प्रेमाने भारावून गेले आहेत. जिकडे तिकडे यच्चयावत प्राणिमात्रांत त्यांना कृष्णच दिसतोय, नव्हे बहीण-भाऊ, काका, आई-वडील सारेच नातेवाईक त्यांना कृष्ण रूप झालेत.

आपणही सर्वजण कृष्णाची भक्ती मनोभावे करतो. अगदी लहानपणी आपण कृष्ण म्हणून डोक्यावर मोरपीस लावतो, हातात बासरी घेऊन वाजवतो. त्याचा फोटोही काढला जातो. आठवणींच्या हिंदोळ्यावर तो कायम राहतो. कृष्णाचं असं अतूट नातं प्रत्येकाशी असते. ते जगताचे गुरु आहेत. हे ही आपल्याला सर्व मान्य आहे म्हणून तर प्रातःस्मरणात आपण ‘कृष्णं वंदे जगद्गुरुम’असे म्हणून दिवसाला सुरुवात करतो.

कृष्णाचा जन्मोत्सव असाच भक्तीभावाने साजरा करतो,उपवास करतो, गोपाळकाला केला जातो, दहीहंडी फोडली जाते, कृष्णाचरित्र ऐकतो, कृष्ण गुणगान करतो, कृष्णचरणी नतमस्तक होतो. अर्जुनाला त्याने रणांगणावर सांगितलेली गीता हृदयाला कवटाळून धरावी अशीच आहे. सामान्य व्यक्तीलाही ती प्रेरणादायी आहे. यशश्री, ऐश्वर्य, औदार्य, वैराग्य या साऱ्याच गुणांनी तो मंडीत आहे. ‘गोरस घ्या, कुणी गोरस घ्या’ असं म्हणणाऱ्या गोपी कृष्ण प्रेमामुळे देहभाव विर्वजीत होऊन ‘कृष्ण घ्या, कृष्ण घ्या’ असं म्हणत त्या सत्-चित् आनंद घन परमात्म्याशी जणू एकरूप झालेल्या असतात.

कृष्णाचा हा महिमा सारे संत -साधक, उपासक जाणून आहेत. सर्वांच्याच ठिकाणी त्या परब्रम्ह स्वरूपाचे कृष्णरूप पहावं जसे या ठिकाणी संतश्रेष्ठ तुकोबाराय पाहतात.कृष्णच माझा गुरु आहे, तोच मला भवसागर पार करून पैलतीरावर नेणार आहे हा विश्वास त्यांच्या ठायी आहे. त्यांना जनात ही असाच कृष्णाच दिसतो व त्यांचे मन ही कृष्णमय होऊन गेले. संत मीराबाई कृष्णभक्त होत्या. त्या म्हणतात, मी सावळ्या कृष्णाला पाहता पाहता ‘मै खुद ही बन गई शाम’ अशी माझी अवस्था झाली. तसेच असाच उत्कट भाव हा अभिप्रेत आहे.कृष्णच सखा, सांगाती आहे. सर्वांचाच पाठीराखा आहे. मा फलेषू कदाचन कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्तव्य विहित कर्म करत राहणे हाच खरा योग व हीच खरी भक्ती.

सदासर्वदा सर्वकाळी व सर्वव्यापी श्रीकृष्ण चैतन्यस्वरूप परमात्मा आत व बाहेर नटून राहिलेला आहे त्या भावात व बोधात सर्वांशी व्यवहार करणे म्हणजे उपासना.

असे करता करता जीवाला विसावा विश्रांती लाभते. निरंजनपद मिळाले की अन्य काही नको वाटते. हसत व नाचत आपण त्या निरंजनपदाला प्राप्त होतो.

‘कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण’ चैतन्यप्रभूंना सागर बघितला तरी कृष्णाची आठवण यायची. माझा कृष्ण म्हणून ते धावत सुटायचे. हा वेडेपणा नाही. भक्ती जेव्हा परिसीमा ओलांडून अद्वैतभावात दृढ होते तेव्हाच हे घडते. हा संतश्रेष्ठींचा अभंग याहून वेगळं काय सुचवितो, या पुरुषोत्तम मासात त्यांच्या कृपेने आपल्याला हे वाण लाभावं हेच त्यांच्या चरणाशी मागणं.

श्रीकृष्ण शरणं मम्….

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.