श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग- ५

जन विनोदे विव्हलतसे

“काम नाहीं काम नाहीं I”
जालो पाहीं रिकामा II धृ II
फावल्या करूं चेष्टा I
निश्चळ दृष्टा बैसोनी II१II
नसत्या छंदे नसत्या छंदे I
जन विनोदें विव्हलतसे II२II
एकएकीं एकाएकीं I
तुका लोकीं निराळा II३II

– अभंग १३९७

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ सिद्ध करून दाखवण्याची उत्कृष्ट संधी या नरदेहातच आपल्याला प्राप्त होते. चांगल्या गोष्टीची सवय व त्यासाठी काढलेली सवड ही छंदात समाविष्ट होते व वाईट सवयी या व्यसनात मोडतात.
आपल्याकडे भारतीय संस्कृतीत चौसष्ठ विद्या व कला आहेत. ते छंद त्यातील नैपुण्य साधल्याने कलाकाराचा जन्म होतो. ढोबळ मानाने आपल्याला लेखन, गायन, चित्रकला, नृत्य, शिल्पकला, पाककला, शिवणकला असे सर्व मान्य व सर्व परिचित ओळखीचे छंद आहेत. छंद व्यक्तीच्या जीवनाला एक वेगळा परिणाम बहाल करतो. मनुष्य प्राण्याला विशेषत्वाने बुद्धीची देणगी लाभलेली आहे त्यामुळे तो त्याचा अधिक वापर करून या छंदाची परिणीती उपजीविकेच्या स्वरूपात करू शकतो. प्रतिभावंत, कलावंत या सदरात मोडतात. त्यांना छंदामुळे नाव लौकिक व पैसा दोन्ही मिळतात.
याउलट व्यक्ती जर नाना प्रकारचे छंद जोपासत बसला तर त्याच्या आयुष्यातील अनमोल वेळ निघून जातो. त्याच्या व्यक्तीमत्वाची हानी होते. त्याला प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळे सावध राहणे गरजेचे असते. आपण आसपास नजर टाकली तर पत्ते खेळणे, जुगार लावणे अशा सवयींचे रूपांतर व्यसनात होते. त्यामुळे जी सर्वांगाने हानी होते ती कधीही भरून निघत नाही. नैराश्याने माणूस अनेक व्यसनांच्या आहारी जातो. कसा कधी हे त्यालाही समजत नाही. म्हणून तुकोबाराया सावध करतात की नाना छंदाने तुम्ही आयुष्य वाया घालवू नका.
काव्य शास्त्र विनोद यांची गरज अन्न- वस्त्र -निवारा इतकीच महत्त्वाची आहे. पण या विनोदाचे चेष्टेत रूपांतर होऊ नये नाहीतर संपूर्ण आयुष्यच निघून जाते व ज्या गोष्टी करावयाच्या होत्या त्यासाठी हातात वेळ राहत नाही. मग कशीबशी पूजा उरकली जाते. घाईने देवाचे दर्शन घेतलं जातं. उपवास केले जातात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही.
जीवांनी नामस्मरणाचा छंद घ्यावा. ध्यानाचा छंद घ्यावा. दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा यासारख्या ग्रंथांचे वाचन व मनन करावे, सत्संगाचा लाभ घ्यावा. सद्ग्रंथांचे श्रवण करावे. हे सर्व करत असताना दैनंदिन व्यवहार व साधना यांचा योग्य व उचित मेळ घालावा, अन्यथा आपला परमार्थ हा चर्चेचा विषय होऊ शकतो. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” आपल्या वागण्यात- बोलण्यात, कृती करण्यात साधनेचे पडसाद दिसायला हवेत. आपली शांती, तृप्ती, प्रसन्नता, आनंद, समाधान हे सारे परिणाम आपल्या आजूबाजूला थोडे का होईना उमटवायला हवेत.
जीवनाचं चरमलक्ष आत्मदर्शन असते. तरी आपण रसिकतेने जीवन जगू शकतो. त्याला कुठलाही प्रत्यवाय नाही. जोग महाराज म्हणतात परमार्थी माणूस हा पुरणपोळी खातो. तो काही कडबा खात नाही. मतितार्थ एवढाच की चांगले भोजन, चांगले वाचन, चांगले श्रवण, चांगले सोहळे साजरे करणे याला काही परमार्थ करायचा म्हणजे बहिष्कृत करायचे नाही. फक्त हवे ते दृष्टेपणा, अलिप्तपणा किंवा साक्षीत्व.
तो ही नेत्री पाही I श्रवणी ऐकतु आहेII
अशी सिद्धी जे योगीजनांची असते. जी तुकोबारायांची आहे. एकाएकी तुका लोकी निराळा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्यासारखेच संसारात सुखदुःखाचे आघात सोसलेले, चढउतार पाहिलेले पण केवळ वेगळेपण हे की त्यांचा छंद असा होतो.
ऐसा घेई छंद I जेणे तुटे भवबंध II
त्यांना एकच नामस्मरणाचा छंद, विठ्ठल भक्तीचा ध्यास त्यामुळे ते जगद्गुरु या पदवीला प्राप्त झाले.

आपणही आपल्या इंद्रियांना फक्त संयमित वळण लावायचे आहे. त्याचा मोहरा योग्य मार्गाला लावून आत्मदर्शनाचे इप्सित साध्य करावयाचे आहे. आपण नकळत त्यात ओढले जाऊ शकतो. जगताची रंगभूमी भुलभुलैय्या आहे. नकळत अधःपतन होऊ शकते. इथं तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हेच खरं.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, तसा नामस्मरणाचा छंद हा सर्वश्रेष्ठ छंद आहे. त्याचं हे मार्गदर्शन तंतोतंत आहे. आपल्यासारख्या विचारवंत, बुद्धिजीवी सुशिक्षित व्यक्तींनीही त्याचा विचार करायला हवा आणि जीवनाचे उन्नयन व सार्थक करावे हीच छंदांची फलश्रुती होय.
श्रीकृष्ण शरणं मम्……

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.