श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग -31
सत्य तोचि धर्म

पुण्य परउपकार पाप ते परपीडा I आणिक नाहीं जोडा दुजा यासीं II1II
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म I
आणीक हे वर्म नाहीं दुजे II ध्रु II
गति ते चि मुखीं नामाचें स्मरण I अधोगति जाण विन्मुखते II2II
संतांचा संग तो चि स्वर्गवास I
नर्क तो उदास अनर्गळा II3II
तुका म्हणे उघडें आहे हित घात I जयाचें उचित करा तैसें II4II

अभंग क्रमांक- 1021

पुण्याची गणती नसावी व पापाची टोचणी नसावी. जीवन गंगेसारखे निर्मळ, स्वच्छ, ओघ असलेले न थांबणारे वाहते असेच हवे.माळी झाडाला पाणी घालतो तसे ते पाणी वाहत जाते तसेच आयुष्यही न तक्रार करता पाण्यासारखे असावे. असे जिणे संतांना अभिप्रेत आहे.नामस्मरण करणे, उपवास करणे, मंदिराला देणगी देणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञयाग करणे, विशिष्ट अनुष्ठान करणे, तीर्थक्षेत्री पूर्वजांचे श्राद्धविधी करणे या सर्व गोष्टी उचितच आहेत. पण एवढे म्हणजेच पुण्य असे नाही. परोपकार महत्त्वाचा मानला पाहिजे. एखाद्याला ज्या गोष्टीची गरज किंवा निकड असेल तेव्हा सर्वोतपरी जमेल ती मदत करणे हा आपल्यापुरता परोपकार. तो अवश्य करावा. फार तर्क -वितर्क पाप-पुण्यासाठी करत राहू नये. इष्ट व अनिष्ट या कल्पना कालसापेक्ष असतात, परिस्थितीसापेक्ष असतात. त्या बदलत राहतात पण धर्माच अधर्मात रूपांतर होत नाही ना व स्वातंत्र्याचे स्वैराचारात याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात,” आईका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा” आपलं ध्येय सत्यस्वरूप पाहिजे तेथे कोणतीही सवलत नाही. परमभाग्याने मनुष्य जन्म लाभलेला आहे. हरिचा दास किंवा भक्त होण्यातच खरे सार्थक आहे. क्षणक्षणाने काळ आयुष्य संपवितो. हा भावसागर तरुन जायचे असेल तर डोळे झाकून इहलोकीच्या व्यवहारात गुंतून जाऊ नये. हरिचा दास होऊन राहण्यातच खरा पुरुषार्थ आहे.

प्रवास करताना सहज दोन पाट्या नजरेस येतात “मनाचा संयम हा उत्तम ब्रेक” आणि “जीवनाला गती हवी” गती आणि संयम या दोन्हींची गरज आयुष्यात आहे. प्रगती शिवाय जीवन नाही व संयमाचा कोंदण असेल तरच जीवन चमकते अन्यथा नाही. तुकोबाराय सांगतात,” तुला ऐहिका बरोबर पारत्रिक, पारमार्थिक जीवन समृद्ध करायचे असेल तर मुखाने नामस्मरण केल्याशिवाय सहज सोपा अन्य उपाय नाही. गीतेचे वचन आहे की जो सत्वगुणी आहे तोच उर्ध्वगतीला जातो राजस मंडळी मध्यम गतीला जातात व तामस प्रवृत्तीच्या लोकांची तर अधोगतीच होते. सत्वगुणी व्यक्ती स्नान- संध्या- नामस्मरण- पूजा- प्रार्थना- सद्ग्रंथांचे वाचन व त्यानुसार आचरण यालाच प्राधान्य देते. “गोविंद गोविंद” असं अखंड स्मरण असेल तर त्याची उत्तम गति ठरलेलीच आहे आणि हे न करता केवळ खाणे पिणे मजा करणे, चेष्टा करण्यात आयुष्य घालवणे असे घडले तर अधोगती निश्चित असते. पण अशी आपली आयुष्याची गाडी घसरणीला लागू नये म्हणून संतांचा संग लागतो.

संतांच्या सहवासात बोरीही चंदनाच्या होतात. कुठलाही गुण-दोष, जात- पात याचा विचार न करता ते आपले म्हणतात व उपासना मार्गाला लावतात. त्यांच्या मनात आले तर रंकाचाही राणा होतो. ते समर्थ बनवतात. सर्व अंगाने संत सुखाचे सागर असतात त्यांच्या गावालाच खरा विसावा मिळतो. त्यांचे घर म्हणजे माहेर असते जो एकदा तिथे जातो तो स्वतःचे घरदार विसरतो.”जो जाई एकवार I तो विसरे घरदार I दासदासांचे माहेर I ऐसा नाही पाहिला I” असे गोंदवल्याचे वर्णन आहे.आळंदी ‘पुण्यभूमी’ मानली जाते. संतांचे वास्तव्य जेथे जेथे होते ती सारी तीर्थ बनतात. संतांच्या योगे निर्गुण भगवंतच आकाराला आलेला दिसतो. तेथे तळमळ, दुःख, क्लेश याची वार्ता नसते. त्यामुळे नुसते त्यांच्या दारात याचक म्हणून रहावे. कोणताही संदेह मनात बाळगू नये.” संत चरण लागला सहज I वासनेचे बीज जळोन जाय I मग राम नामें उपजे आवडी I सुख घडोघडी वाढीतसे I” त्यांच्या सहवासात हे सहज घडते. हे साधन सुलभ व गोमटे आहे. पण यासाठी पूर्वपुण्य लागते. महत्भाग्याने ते भेटले तर त्यांचे चरण मात्र सोडू नये कारण तिथेच स्वर्ग आहे. बाकी कितीही जगामध्ये सुंदर सुंदर सौंदर्यस्थळे पाहिली तरी ते सुख वेगळे असते. संत संगामध्ये जन्मोजन्मीचे दुःख विसरले जाते.” जीव दोंदावरी लोळे आनंदाचीया” असे ज्ञानेश्वर माऊली सांगते. त्यांच्या पाद्यपूजेचा योग आला तर घराचा स्वर्ग होतो. “साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा”

“गुरु हा संत कुळीचा राजा I गुरु हा प्राणविसावा माझा I गुरुविण देव दुजा I पाहता न ये त्रिलोकी II” असे माऊली म्हणतात तेच खरे. त्यामुळे आपलं हित कशात आहे हे आपणच ओळखावे. आपण सारेच या ज्ञानाचे अधिकारी होऊ शकतो पण कंदीलाच्या काचेवर काजळी जमली तर प्रकाशही स्वच्छ पडत नाही. त्यामुळे आपणही स्वानंदधनआत्मा असूनही देहबुद्धीच्या बळकट सहवासाने त्याचा विसर पडतो व सुख-दुःख, पाप-पुण्य, माझे- तुझे या भोवऱ्यात सापडुन या भवसागराच्या चक्रात सापडतो. यावर एकच उपाय व तो संतांचा संग. आपणच आपले उचीत काय ते शोधावं. नाहीतर त्यांच्या ग्रंथाचा संग करावा. ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा यांना गुरुस्थानी मानावे व आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हावे.

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.