श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष

अभंग- २

काय पापपुण्य पाहों आणिकाचे

कासया गुणदोष पाहों आणिकांचे II
मज काय त्यांचे उणें असे II धृ II

काय पापपुण्य पाहो आनिकांचे I
मज काय त्यांचें उणें असें II१II

नष्टदुष्टपणा कवणाचें वाणू I
तयाहून आनु अधिक माझे II२II

कुचर खोटा मन कोण असे आगळा I
तो मी पाहों डोळा आपुलिये II३II

तुका म्हणे मी भांडवले पुरता I
तुजसी पंढरीनाथा लावियेलें II४II

– अभंग क्रमांक २०२५

सर्वगुणसंपन्न अशी व्यक्ती अपवादानेच आढळते. व्यक्ति कितीही मोठी झाली तरी एखादा दोष, एखादा अवगुण हा त्याच्या ठायी राहतोच ही एक स्वाभाविक स्थिती आहे. जन्मोजन्मीचे संस्कार याही जन्मीचे संस्कार. अनुवंशिकतेने लाभलेले गुण व अवगुण, सत्व-रज-तम गुणांचा प्रकृतीवर असलेला पगडा ह्याने व्यक्तिमत्व बनते. पंचपकवान्नाच्या ताटात जसे सहा रसाने युक्त पदार्थ असतात तसेच कोणाची प्रकृती धाडसी तर कोणाची तापट, कोणाची विवेकी, कोणाची जहाल तर कोणाची मवाळ असते. यातही गंमत असते या विविध गुणांचे जगामध्ये वावरताना गरज भासते. केवळ एकच गुण राहिला असता तर एकसुरीपणा झाला असता. जग तर विविधतेने समृद्धतेने नटलेले आहे. ते चैतन्यमय व चैतन्यस्वरूप आहे. इथे एकाच जमिनीतून आंब्याच्या विविध जाती उगवतात. त्यात हापूस, पायरी, रायवळ, बदाम, नीलम, तोतापुरी, लंगडा अशा जाती आहेत. आंबा हे एकच फळ पण त्याचे अविष्कार किती व रुची भिन्नता ही किती. काहींना हापूस आवडेल काहींना चाखून खायचा आंबा आवडेल हे विविधता स्वागतार्ह आहे.

विविधता आसमंत दरवळून टाकते व जीवन सुखी व समृद्ध करण्यास मदत करते. याउलट आपला बघण्याचा दृष्टिकोन दोषयुक्त असेल तर आपल्याला जग खोटे, पापी, अवगुणी व दुष्ट भासेल. कावीळ झालेल्या माणसाला जग जसे पिवळे दिसते तसेच घडेल. इथं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आत्मपरीक्षण करायला सांगतात व मीही तेच करतो असे प्रतिपादन करतात. वस्तूतः त्यांना ती गरज नाही. कारण संत- सज्जन- साधकांमध्ये सद्गुणांचा अधिकाधिक परिपोष असतो त्यामुळे ते हवेहवेसे वाटतात. त्यांना पुन्हा पुन्हा पहावे त्यांच्याशी बोलावे, भेटावे असे वाटते किंबहुना त्यांचे चरण सोडून नये असे वाटते.

आपुलेची गुणे I पराव्याचे उणे फेडून पहाणेII

हा गुण त्यांच्या ठायी असते संत, सद्गुरु हे जनमानसात मिसळतात किंबहुना जनमानसाचे होऊन राहतात. इतरांचे अवगुण, दोष, व्यंग यांची ते चर्चा करीत बसत नाहीत. चांगल्या गुणांचा आवर्जुन उल्लेख करतात. पण एखादा अवगुण सोडून देतात. अमानित्व, अदभित्व असे सद्गुण, त्याग परिपोष व्यक्तीमध्ये व्हावा म्हणून लहान लहान अवगुण ते दुर्लक्षित करतात. त्याचा डांगोरा पिटत नाहीत याचा अर्थ अवगुणी असू नये. पण एखादा दोष प्रकृतीत राहतो जो जात नाही तिथे अडून राहू नये. पुढे चालू लागावे.

चाल केलासि मोकळा I
बोल विठ्ठल वेळोवेळा II

आपल्या अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, तू चालत आहेस ना या मार्गावरून मग आता भय- चिंता- काळजी नको. पापाचे तर भय नकोस नको. ते मुखात नामस्मरण करणाऱ्या भक्तीचे पूर्ण हमी घेण्यास तयार आहेत. प्रयत्न मात्र व्हायला हवा. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे किंवा मुंगीने उत्तम मुंगी होण्याचा प्रयत्न करावा. ही विनोबाजींची वचने जर अभ्यासली जातील तर अवगुणांचा त्याग घडून सद्गुण निश्चित वाढीस लागतील. मीच मोठा, मीच श्रीमंत, मी सुशिक्षित, मीच समाजसेवक, मीच भक्त असा भाव कधीही नसावा.

नम्र झाला भूता Iत्याने कोंडीला अनंता II

हे मनी वसु द्यावे. आपण काय आहोत हे आपल्या स्वतःला व जवळच्या व्यक्तीला नक्कीच ठाऊक असते. शेजारीपाजारी एकमेकांना पूर्ण ओळखत असतात. त्यामुळे..

गोड सदा बोलावे,स्वांतर शुद्ध असावे I
कपटाचरण कधी न वश व्हावे II

हाचि सुबोध गुरुचा, हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मार्गदर्शन अगदी चपलख आहे. त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करावा, आत्मपरीक्षण करावे, दुसऱ्याची टिका करणे व निंदा करणे हा सर्वात मोठा दोष आहे, अवगुण आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाला कलंक लागणारा आपला आपला शत्रू आहे.

चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कवण अंग I

तसेच सज्जनांमध्ये शोधूनही अवगुण सापडत नाहीत. हा फार मोठा अभ्यास आहे, फार मोठा प्रवास आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पायावर माथा ठेवून आपण या प्रवासास सुरुवात करूया, पुरुषोत्तम मासाचे निमित्य साधून.

श्रीकृष्ण शरणं मम्…..

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.