श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग-29

आड घाली सुदर्शन

पडतां जड भारी I
दासीं आठवावा हरि II1II
मग तो होऊं नेदी सीण I
आड घाली सुदर्शन II ध्रु II
नामाच्या चिंतेने I
बारा वाटा पळती विहने II2II
तुका म्हणे प्राण I
करा देवासी अर्पण II3II

अभंग क्रमांक 2375

घरात अनुभवी व वृद्ध मंडळी असतील तर त्यांच्या तोंडून आपण ऐकलेले असेल ‘जो चोच देतो तो दाणाही देतो’ म्हणजे एक सत्ताधारी भगवंत सर्वांचा संभाळ करतो हे निश्चित आहे.एकनाथ महाराजही म्हणतात,” सकल जीवांचा करीतो सांभाल I तुज मोकलील ऐसे नोहे I ” त्यामुळे सतत भगवंताकडे मागणं मागु नये कारण ते मागणं मग संपतच नाही. व्यक्तिगत आयुष्यात ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हेच खरे. पण सगळे प्रयत्न संपल्यावर चित्ती समाधान ठेवुनच राहावे लागते. भक्त असा असावा की देवाने त्याच्याकडे पहावे व म्हणावे ‘तुला काही हवे आहे का?’ न मागताच तो त्याचे सारे कोड पुरवितो “न मागे त्याची रमा होय दासी”

स्वामी विवेकानंद एकदा रामकृष्ण परमहंसंकडे गेले त्यांना अर्थार्जनाची गरज होती आपल्याला नोकरी मिळावी असे वाटत होते.परमहंस यांनी त्यांना सांगितले “माझ्या कालीमातेकडे काय मागायचे ते माग ती सर्व काही देईल” स्वामी विवेकानंद तीनदा काली मातेकडे गेले व त्यांनी नोकरी न मागता ‘भक्ती, ज्ञान, वैराग्य” मागितले व असामान्य व्यक्तिमत्व म्हणून स्वामीजी जगासमोर आले. कोणाला काय द्यायचे हे त्या जगदीश्वराला ठाऊक असते.म्हणून आपले काम एकच असते आवडीने, प्रेमाने,भक्तीने सतत नामसंकीर्तन करायची जीवाला सवय लावायची. रामदास स्वामीही सांगतात “काहीच न करोनि प्राणी I रामनाम जपे वाणी I तेणे संतुष्ट चक्रपाणी I भक्तालागी संभाळी I” इतकी माफक अपेक्षा आहे की इतर काही कष्टसाध्य साधन न करता मुखाने “कृष्ण हरि कृष्ण हरि’ असे म्हणायचे असे करता करता बारा आणि बारा ,चोवीस वर्षे झाली की,” नामे स्मरे निरंतर I ते जाणावे पुण्य शरीर I महादोषांचे गिरीवर I रामनामे नासती I” असे आपले पुण्य शरीर बनते व पर्वता एवढे दोष जरी असले तरी तेही नाहीसे होतात संत तुकाराम महाराज हे सर्वोत्तपरी नाम महिमाच गातात ते म्हणतात,” नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची” जन्मोजन्माची पापे जातात. नाही जन्म मरण खंडन होते. संचित- क्रियमाण-भोग तर नाहीसे होतात. त्रिविध ताप पळून जातात. कळीकाळाचे भयच राहत नाही. प्रिया- पुत्र -धन हे सुख देतात. पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच नाहीतर त्यांचा शीण होतोच. नामस्मरण करीत राहिले तर संसाराच्या चढ उतारात जो काही अस्वस्थ करणारा अनुभव तो नामाने सुखकारक व शांत होतो.

नामाहुन प्रभावी अन्य साधन नाही. वाल्या कोळी सारखा मारेकरी तोही तरुन गेला. अजामेळ पापी तो मुक्त झाला. प्रल्हादाच्या हाके सरशी तो स्तंभातून प्रकट झाला. तर ध्रुव बाळाला अढल स्थानी बसविले. पुराणातले किती म्हणून दाखले द्यावेत. परीक्षित राजा सात दिवसात मुक्त झाला. निजून त्याचे नाम घ्या, बसून घ्या किंवा कीर्तनात डोलत घ्या हा चक्रपाणी मागे पुढे उभा राहतोच. नामाचा एकूणच महिमा अद्भूत आहे. वैष्णवांच्या घरी रिद्धी सिद्धी दारात उभ्या असतात कोटी कोटी यश करून काही साधेल असे नाही ते एका नामाने जमून जाते. कलियुगात तर नामापरते श्रेष्ठ साधन नाही. म्हणून भगवंताकडे मागणं मागताना एकच मागावे “सदा माझ्या डोळा I जडो तुझी मूर्ती I रखुमाईच्या पती सोयऱिया Iगोड तुझे रूप गोड तुझे नामI” हे गोड प्रेमाने सद्भावानेने जपता जपता त्याची अमृतमय गोडी देऊन जाईल व ‘अमृतास्य पुत्रो अहं” या उत्कट भावापर्यंत आणून पोहोचविल. नामाच्या चिंतनाने शरणागताला देव वज्रपंजरु होतो. माऊली वर्णन करताना म्हणतात आपल्या भक्ताला तो आत्मबोधाच्या पिंजऱ्यात सुखरूप ठेवतो. समर्थ रामदास स्वामी ही सांगतात,” समर्थाचिया सेवका I वक्र पाहे I असा सर्व भूमंडळी कोण आहे” दासाची उपेक्षा रामराया कधीच करत नाही. मग त्याच्यापुढे शत्रूंचा काय पाड किंवा विघ्न तरी काय काय राहणार. विघ्न आले तर सुदर्शन आड घालणारच म्हणूनच. म्हणून तर तुकोबाराय ही म्हणतात,”हाकारोनी सांगे तुका I नाम घेता राहू नका I”

तुमच्या आवडीचे नाम दीर्घकाळ, निरंतर, न कंटाळता सप्रेमाने एकाच ठिकाणी बसून घ्या. ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘ओम् राम कृष्ण हरी’, ‘कृष्ण कृष्ण जय कृष्ण’, ‘ओम् नमः शिवाय’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ गोडीने कोणतेही नाम घ्या.केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे लोकप्रिय गाणं पांडवाचा रथ हाकून कौरवांना पळवून लावल्याची खरी साक्ष देतोच.

‘नाम सदा बोलावे’ हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची नामाविषयीची प्रार्थना परिपूर्ण आहे. नामाशिवाय अन्य सत्य कोणतेही नाही नामात रंगून व्यवहारी सर्व भोगावेत पण त्यात गुंतू नये. स्वांतर शुद्ध असावे. कपटाचरण करू नये. मन कोणाचे दुखवू नये. रामालाच सखा मानावे, मी रामाचा दास आहे यत्न भरपूर करेल पण यश देणे न देणे ही रामा तुझी सत्ता असेल असा भाव असावा. समाधान महत्त्वाचे आहे. नाम घेणारा समाधानी हवा. त्यामुळे भगवंताकडे काही मागणे म्हणजे कामधेनु देणे व इतर काही मागण्यासारखे आहे. त्यामुळे तो सर्वशक्तिमान पण नामाच्या प्रेमात अडकून राहतो जेथे नाम तेथे तो प्रत्यक्ष हजर असतो. असा नामाचा अद्वितीय महिमा आहे. नामकिर्ती वाढवित रहावी. हाच सर्व संतांचा सद्गुरूंचा सुबोध असतो.

श्रीकृष्ण शरणं मम् …….

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.