श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग -28

उपाधि नसावी अंर्तंबाह्य

साधकाची दशा उदास असावी I
उपाधि नसावी अंतर्बाही II1II
लोलुपता काय निद्रेतें जिणावें I
भोजन करावें परमित II ध्रु II
एकांती लोकातीं स्त्रियांशी वचन I
प्राण गेल्या जाण बोलों नये II2II
संग सज्जनाचा उच्चार नामाचा I
घोष किर्तनाचा अहर्निशी II3II
तुका म्हणे ऐसा साधनीं जो राहे I
तो चि ज्ञान लाहे गुरुकृपा II4II

अभंग क्रमांक 2836

“अवगुणांचा करोनी त्याग I जेणे धरिला संतसंग I तयासी बोलिजे I साधक ऐसा I” समर्थ रामदास स्वामींचे दासबोधातील साधकाची ही नेमकी व्याख्या. अवगुण अनेक असतात जसे उत्तम गुण ही अनेक असतात. पण आपला अवगुणच आपल्याला गुण वाटला तर तो सर्वात मोठा अवगुण ठरतो. जगात राहायचे म्हणजे मिळमिळीत राहून चालत नाही एकाचे दोन करावेच लागतात असा अंदाज काढून वागणे योग्य नाही मग तो अवगुण ठरतो. तारतम्यभावाने राहता आले पाहिजे. साधकाची दशा उदास असावे म्हणजे अखंड मुड ऑफ नाही. तर सुख झाल्यावर एकदम नाचू नये व दुःखाने खचून जाऊ नये. आलेल्या प्राप्त परिस्थितीचा स्वीकार सहज करावा इतकेच. देहच मी तेव्हा देह संबंधी उपाधी या येणारच.अगदी मी स्त्री किंवा पुरुष, शिकलेला, धनवान, प्रतिष्ठा असलेला पुन्हा लोकांकडून मिळालेल्या पदव्या, स्वतः मिळविलेल्या पदवा या साऱ्या उपाधीत आपण लिप्त नसावे. मन तर अलिप्त तर असावे. साधी राहणी, उच्च विचारसरणी अशीच आपली वेशभुषा, केशभुषा व एकूणच वर्तन नम्र असावे. यात अचानक बदल करू नये. प्रथम प्रथम पासून जर पांढरे वस्त्र घालत असु तर तसेच घालावे एकदम भगवी कफणी ची काही आवश्यकता नाही. “वेश असावा बावळा I परी अंतरी असाव्या नाना कळा I सकळ लोकांचा जिव्हाळा मोडूची नये I” लोकांचा जिव्हाळा साधकाने कधी मोडू नये. लोलुप म्हणजे हवेपण. ‘प्रत्येक गोष्ट किंवा वस्तु हवी’ कसे शक्य आहे? व त्याची आवश्यकता नाही. जीवन सर्व बाजूंनी संयमित हवे. स्वामी स्वरूपानंद आपल्या अभंगात सांगतात की, तू मौन धरू नको किंवा खूप बोलू नको, उपाशी राहू नको खूप जेवणही नको, अगदीच झोप अति चांगली नाही जागरणही बरोबर नाही.सगळीकडून ‘परिमित’ असे जीवन असावे तर सहज योगसिद्धी प्राप्त होते.सध्याच्या काळात स्त्रियांशी भाषण करू नये हे शक्य नाही कारण सर्वच क्षेत्रात त्यांचाही संचार आहे. पण बोलणं प्रमाणात असावे,मोजके व नेमके असावे,मार्गदर्शनपर असावे. स्त्री व पुरुष दोघांनीही शिष्टाचारसंमत बोलण्यास काही हरकत नाही.

याउपर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सज्जनांच्या सहवासात राहायचे. कारण समाधान त्यांच्या सहवासातच टिकून राहते. आजूबाजूला पाहिले तर नाना छंदात लोक मग्न असतात. काही छंद चांगले असतात ते व्यक्तीचा उत्कर्ष करतात. काही छंद वाईट सवयीचे असले तर नुकसान ही संभवते म्हणून साधकाने जाणीवपूर्वक साधकांच्या मध्येच राहावे. जेथे हरीकथा चालु आहे नामस्मरण आहे सत्संग आहे.आपली नोकरी, धंदा, व्यवसाय झाल्यावर जो काही वेळ मिळेल तो अशाच मित्रांसोबत घालावा जे हरीभजनासाठी तत्पर आहेत. तुकाराम महाराज म्हणतातच “ते माझे सोयरे सांगाती सज्जन I पाय आठविती विठोबाचे I” याही खेरीज ते रंगलेले हवेत कीर्तनात. “नाचू कीर्तनाचे रंगी I ज्ञानदीप लावू जगी” ही त्या साधकांची भूमिका हवी. कीर्तनाचा घोष करणे सोपे नाही. त्यासाठी मान कणखर लागते कारण भगवंताचे नाम अगदी अमृताहुनी गोड आहे हे निश्चितच पण कीर्तनात रंग भरलेले असतानाच निद्रा देवी प्रसन्न होते त्यामुळे सावध राहावे लागते.ते जमले तर किर्तनासारखे चांगले काही नाही कारण किर्तन करता करता देह हरिरुप होतो,प्रेमानंदे तो नाचतो, डोलतो आणि फक्त देवच राहतो. देवभक्त एकरूप होतात. कळीकाळाचे भय राहत नाही. वैराग्याचे बळ असेल व तो कीर्तन करत असेल तर देव स्वतः त्याची निवड करतात. तो देवाला अधिक प्रिय असतो. साधकाने असा अधिकार संपन्न करावा जेणेकरून आपली गुरुमाऊली ही संतुष्ट होईल.

साधकाने सद्गुरु ने सांगितलेली उपासना कधीही सोडू नये. गुरु शिष्याला इंद्रियदमन शिकवतातच किंबहुना शिकवावे असेच रामदास स्वामींही सांगतात.”शिष्यासी न लावती साधन I न करती इंद्रियदमन I ऐसे गुरु अडक्याचे तीन I मिळाले तरी त्याजावे I” असा परखड व रोखठोक विचार ते मांडतात तसाच विचार संत तुकोबाराय प्रकट करतात “साधक जाले कळी I गुरुगुडीची लांब नळी II1II पचीं पडे मद्यपान I भांगभुर्के हें साधन II ध्रु II अभेदाचें पाठांतर I अतिं विषयीं पडीभर II2IIचल्यांचा सुकाळ I पिंड दंड भंगपाळ II3II सेवा मानधन I बरे इच्छेनें संपन्न II4II सोगांच्या नरकाडी I तुका बोडोनियां सोडी II5II ” कठोर शब्दातच त्यांनी साधक कसा नसावा याचे मार्गदर्शन केले आहे.

साधकाने गुरुप्रती अतिशय शुद्ध व प्रामाणिक भाव राखावा. गुरु हे एक तत्त्व आहे. चिदानंद रूप शिवो.. हं शिवो..हं त्या सत् वस्तू विषयी आदर ठेवून त्या दिशेनेच आपणही मार्गक्रमण करीत आहोत का याचे वेळोवेळी आत्मपरीक्षण करावे. देहाने त्यांची सेवा घडली तर उत्तमच पण केवळ गुरूंचे पाय चेपणे हे सेवेचे स्वरूप नसावे. त्यांनी सांगितले तसे आचरण घडावे. त्यासाठी नामस्मरण, ध्यान, सत्संग, सद्ग्रंथांचे वाचन, त्यांचे मनन व चिंतन व नंतर त्याचेच प्रबोधन या अंगाने गुरुची सेवा घडत राहिली तर सहजच तो ‘ज्ञानास’ प्राप्त होतो. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे ज्ञान परम दुर्लभ आहे पण गुरुकृपेने ते साधक जाणतो.

श्रीकृष्ण शरणं मम् …

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड,पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.