श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग- 20

मानी संताचे वचन

सुख पाहतां जवा पाडें I
दुःख पर्वताएवढें II1II
धरीं धरीं आठवण I
मानीं संताचे वचन II ध्रु II
नेलें रात्रीनें ते अर्धे I
बालपण जराव्याधें II2II
तुका म्हणे पुढा I
घाणा जुंती जसा मूढा II3II

अभंग क्रमांक 88

उपनिषदांनी मानवी आयुष्य मर्यादा शतावर्षे सांगितली आहे. आपणही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना “जीवेत शरद शतम्” असे म्हणतो. प्राचीन काळी ब्रह्मचर्यआश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे चार आश्रम व त्यात मानवी जीवनाचे विभाजन ही पद्धती रुढ होती. एक प्रकारचे शिस्तबद्ध व संयमित जीवन व शांत जीवनप्रणाली होती.”आयुष्य हीच रत्नपेटी” मिळालेला मनुष्य जन्म हा खरंचच खूप दुर्लभ असतो. एकीकडे हे नरदेहासारखे सुंदर घबाड व एकीकडे काळाचा वेग यात विवेकान मेळ घालावा लागतो.

काळ वेगाने पुढे सरकत राहतो. बालपण येते जाते, तरुणपण येते जाते, वृद्धत्व येते आता पिकलं पान केव्हाही गळून पडणार हे ध्यानी येऊ लागते. घटका-पळे पटापट निघून जातात आणि आयुष्याचा नाश होतो म्हणूनच,”नाशिवंत देह जाणार सकळ Iआयुष्य नेतो काळ सावधान I” असे संत मंडळी आपल्याला जागे करतात.”घटका गेली, पळे गेली काळ वाजे घणाणा आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना?” असा प्रश्न त्यांनी केला. इथं नकारात्मक विचारसरणी मुळीच नाही. पण दिवस अगदी रोजचा पाहिला तरी किती पटकन जातो. नित्य वैयक्तिक स्वच्छतेची कामे, आपले न्याहरी-भोजन, कामाच्या ठिकाणी आठ नऊ तास, आप्तस्वाकीय, मित्र-मैत्रिणी यांच्याशी वार्तालाप,झोपेसाठी सात आठ तास जातात यातून 24 तास कसे निघून जातात. असेच दिवस, महिने, वर्षे येतात व निघून जातात. अगदी नकळत हे घडतं आपण त्याला ‘रुटीन’ म्हणतो. या ‘रुटीन’ आयुष्यात अनेक चढ-उतार आहेत, सुखदुःख आहेत. त्रिविध तापांनी ते व्यापलेले आहे. अगदी “आधी हाताला चटके मग मिळते भाकर” ही स्थिती आहे. छोटी छोटी दुःखही आहेत व तरुणपणीच पती किंवा पत्नीचा वियोग होण अशी ही दुःख आहेत. यात अतिशयोक्ती नाही म्हणून तर एकूणच “सुख पाहता जवा येवढे दुःख पर्वताएवढे हे अगदी सार्थ ठरते.

लहानपणी दृष्टीला आई पडली नाही तर व्याकुळ होणार, रडणारे बालक पुढे थोडे मोठे होताच खेळायला बाहेर पडते. ते मग आईने कितीही हाका मारल्या तरी घरात येत नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याला खेळाचीच आवड लागते व मित्रांसोबत सारखाच तो खेळाचा डाव मांडतो. तरुणपणी त्याला पैशासाठी पोटाची चिंता मिटवण्यासाठी कामाला बाहेर पडावे लागते. कधी कधी तर विदेशात जावे लागते.पुढे विवाह नंतर जबाबदाऱ्या वाढत जातात व वृद्धापकाळी हळूहळू नाना रोग देहात येऊन घर करतात आणि कधी आपण साठीला पोहोचतो हे कळत नाही. “साठीशांती” चा कार्यक्रम होतो. पण जीव खरंच शांतस्वरूप, आनंदस्वरूप होत का नाही ठाऊक नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात,*” घाणा जुंती जसा मुढा”* याला नक्कीच अर्थ आहे हे पटते. संसाराचे व्याप व जबाबदारी दिवसेंदिवस वाढते कमी होत नाही. सृष्टी चक्र चालूच राहतं. मुलांच्या मुलांचे संगोपन, आजारपण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह, धंद्यातील चढ-उतार याकडे पाठ फिरवता येत नाही व घाण्याला जसा बैल जुंपावा तसे हे रहाटगाडगं चालूच राहते. पूर्ण दुःखाचा अनुभव हा नसतो पण एकूणच स्वरूप सुखदुःख मिश्रितच असते. अलीकडच्या काळात तर नातवंडांसाठी ‘बर्थडे पार्टी’ करावीच लागते. “कालाय तस्मै नमः”

प्रपंच उत्तम संपादन करणे याला विरोध नाही. आपण प्रयत्नाने कला, शिक्षण,व्यवसाय, नोकरी येथे उत्तम स्थान प्राप्त निश्चित करू शकतो. पण आमचा प्रपंच उत्तम आहे मग देवाची आता काय गरज आहे ही विचारसरणी बरोबर नाही व आपल व्यक्तिमत्व घडवायला आपण शालेय जीवनापासून सुरुवात करतो तिथं वयाची अट नसते मग नामस्मरण, ध्यान, सदग्रंथांचे चिंतन वाचन, यासाठीच वयोमर्यादा कशा साठी ? बालपणापासूनच उत्तम संस्कार करावेत. शक्ती युक्ती दोन्ही असल्याने तरुणपणी प्रपंच व परमार्थ दोन्ही करावेत कारण कोणता समय कधी येईल ते सांगता येत नाही.*”कोण समय येईल कैसा कैसी माता कैसी पिता बहिण बंधू सखा सोयरा”* कोण कधी इहलोक सोडून जाईल सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, “धरी धरी आठवण” दोनदा धरी धरी म्हणतात कारण आपल्याला भगवंताच्या निश्चित विसर पडू शकतो. उत्तम प्रपंच संपादायला वेळ द्यावाच लागतो. हा विसर पडू न देता आपण संत वचन अभ्यासावीत. त्यांचाही विचार करावा. काही काळ चिंतनासाठी आवश्यक द्यावा.असे त्यांचे आपल्याला मार्गदर्शन असते. प्रपंच सुखाने करावा पण परमार्थ पूर्ण बुडवावा असे करू नये. संत व सद्गुरू खूप कृपाळू असतात. जनमानसाची रीत त्यांना ठाऊक असते.” आवा चालली पंढरपुरा I वेसी पासून आली घरा I परिसे ग सुनबाई नको वेचू दूध दही ” हाच स्थायीभाव प्रपंच जनाचा ते ओळखून असतात. प्रपंच करण्यासाठी बरीच शारीरिक, मानसिक, आर्थिक शक्ती खर्च होणार हेही ठाऊक असते म्हणून अतीव उदार होऊन कृपावंत होऊन ते म्हणतात ‘देवाच्या दारात’ रोज क्षणभर तरी उभा रहा. “हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी”*

श्रीकृष्ण शरणं मम्…..

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड ,पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.