श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग – १४

तो कृपासिंधू निवारी साकडे

 

आलिया भोगासी असावें सादर I देवावरी भार घालूनियां II१II

 मग तो कृपासिंधु निवारी सांकडे I

 येर तें बापुडे काय रंके II ध्रु II

 भयाचिये पोटी दुःखाचिया रासी I शरण देवासी जातां भले II२II

तुका म्हणे नव्हे काय त्या करिता I चिंतावा तो आंता विश्वंभर II३II

 

अभंग क्रमांक २३८६

 

दुपारची निवांत वेळ आहे. रस्त्यावर विशेष गर्दी सुद्धा नाही. आपण आपल्या टू व्हीलर वर शांततेने जात आहोत. काही चूक आपल्याकडून नाही. पाठीमागून एक सायकलस्वार येतो. एक धडक जाणून बुजून नाही, नकळत टक्कर दिली जाते. दोघेही कोलमडतात व पायाला फ्रॅक्चर होते. औषध पाणी यासह सक्तीची महिनाभर विश्रांती घ्यावी लागते. त्यावेळेस नकळत शब्द बाहेर येतात ‘आलिया भोगासी असावे सादर’आता विचार करून उपयोग नसतो. माझ्या बाबतीत का घडले? असे का झाले? मनात खेद असतो. पण ती खंत आता काही कामाची नसते.देवावर भार

टाकून, दोन माणसांवर विश्वास टाकून काम करून घ्यावी लागतात. प्रपंचात मनासारख्या गोष्टी नेहमी घडतातच असे नाही कित्येक वेळा मनाविरुद्ध घडतात.एखादी गोष्ट प्राप्तव्य असेल तर मिळण्यास कधी कधी कालावधीही जातो.उदाहरणार्थ विवाह, नोकरी, शिक्षण ,स्वतःचे घर, परदेशगमन संधी इत्यादी. मग धीर हाच उपाय ठरतो. सहनशक्तीची फार मोठी कसोटी लागते. चुकीच्या मार्गाने जाऊन नवस ,बुवाबाजी असा मार्ग चुकू शकतो. यावेळेस महाराज सांगतात तो कृपासिंधू दयेचा सागर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल. तो तुमच्या दुःखाचे निवारण करेल. तुम्ही मुखात ‘गोविंद गोविंद’ या नामाचा उच्चार करीत रहा. मन प्रसन्न व समाधानी ठेवा. ही गोष्ट अवघड आहे सोपी नाही पण ती तुम्ही प्रयत्नपूर्वक करा. पूर्ण भार त्या कृपासिंधू वर घातला की तो ‘कैवार’ घेतल्याशिवाय राहणार नाही. तो दीनांचा कैवारी आहे. दुःखितांचा सोयरा आहे.आपल्या भक्ताची तो कधीही उपेक्षा करणार नाही. समर्थ रामदासस्वामींची हनुमंताविषयी एक सुंदर आरती आहे,

कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमानII

पाठी असता तो जगजेठी वरकड काय गुमान कैवारी हनुमान II

 

नित्य निरंतर भजकारक्षी धरोनियाअभिमान आमचा कैवारी हनुमानII

 

दास रक्षी हाचि भरवसा वदतो त्याची आन.कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान II

 

आपणही ‘विठ्ठलभक्त’ असो किंवा ‘विठूचे दास’ असू भिण्याचे काही कारण नाही कारण ‘भये व्यापले सर्व ब्रह्मांड आहे’ ही वस्तुस्थिती आहे. देहच मी व त्या संबंधित सारे ही भय उत्पन्न करणाऱे आहे. आज देह उत्तम आहे उद्या पोट दुखेल सांगता येत नाही. देहसंबंधित नातेवाईक आज असतील उद्या नसतील. हे सत्य नाकारता येत नाही. आज वैभव आहे कायम राहिले पाहिजे. आपल्या भोवतीची सामाजिक -राजकीय- नैसर्गिक परिस्थिती सतत बदलते व ते भयही राहते. ‘कोरोना काळात’ हे सारे आपण अनुभवले. भय इथले संपतच नाही हेच खरे.

आता तुकाराम महाराज सांगत आहेत भयाच्या पोटी अखंड दुःखच अनुभवयास येते. त्यामुळे संसारिक माणसाची अनुभती ‘ सुख पाहता जवापडे दुःख पर्वताएवढे’ अशीच राहते.मग आता त्याने नैराश्य, हताशपणा, उदासीनता, हतबलता यांतच आयुष्य व्यतीत करायचे का? तर त्याचे उत्तर ‘नाही’, देवाला शरण जायचे. सारा भार प्रयत्न केल्यानंतर रामरायावर टाकायचा.”मी कर्ता म्हणशी I त्याने तू कष्टी होशी I ” राम करता म्हणता पावशी यश,कीर्ती प्रताप .कर्तेपणा भगवंताकडे द्यायचे व सुखाने संसार करायचा.

 

“मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाणू निरंतर”

 

आपली दैनंदिन कर्मे, व्यावसायिक कर्मे, नोकरी विषयक कर्मे, सामाजिक बांधिलकी सारे व्यवस्थित पार पाडायचे काही न्यून ठेवायचे नाही. तो विश्वंभर सर्वसृष्टीचा नियंता आहे, पालनकर्ता आहे. त्याच्या इच्छे शिवाय झाडाचे पान हालत नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून निवांत राहायचे. अतिशय दुःख व शोक या दोन्ही गोष्टी टाळायच्या.सगळ्यांची चिंता आपण डोक्यावर घेऊन काही प्रश्न सुटायचे नाहीत. प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करते पण शेवटी ,*”अन्न, मान,धन हे तो प्रारब्धाधीन”* हे सत्य नाकारून चालत नाही. हे लक्षात घेऊन शांती धरावी.

शांती परते सुख नाही. संत एकनाथ ‘शांतीब्रह्म’ होते. किती वेळा एक युवक त्यांच्या अंगावर थुंकला प्रत्येक वेळेस स्नान केले पण रागावले नाहीत म्हणून ते ‘शांतीब्रह्म’. संसारातही आपण तुझे -माझे, हेवे -दावे, मानसन्मान ,अपमान, कलह, मतभिन्नता अनुभवतो पण अभिप्रेत आहे शांती. सर्व चढ-उतारात शांती टिकून राहिली पाहिजे. यासाठी स्वतःच्या देहाचे फार स्तोम आपण माजवले नाही पाहिजे.अहंकार मीपणा, आत्मसन्मान या गोष्टी नकळत उफाळून येतात व हाती विशेष काही लागत नाही.

 

याउलट संतांच्या घरी पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालू असते. ती त्यांची ‘मिरासदारी’ त्यांना वाटते. नित्य नामाचा सुकाळ त्यामुळे कळी काळाचे भय नसते.भजना बरोबर नित्य ब्रह्म रसाचं पारायण कीर्तनात, प्रवचनात अनुभवण्यास मिळत असते आणि परोपकाराची पद्धत याने त्यांचे जीवन तृप्ती, समाधान, आनंद या सर्व भोगांची ‘उत्तम दशा’ सर्वांगाने ते अनुभवत असतात.

 

श्रीकृष्ण शरणं मम्….

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे

             कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.