पेट्रोल पंपांवर इंधन संपले तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्यानंतर ट्रक, टँकर चालक आक्रमक झाले आहे. या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला असून अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावरच उभी आहेत. यामुळे राज्यातील पेट्रोल पंपांना होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे.

मनमाड येथील एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून राज्यातील अनेक भागांत इंधन पुरवठा होतो. पेट्रोल-डिझेल-गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला. फळे, भाजीपाला, दूध, शेतीमाल यासारख्या वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संप पुकारल्याचे माहिती पडताच राज्यातील अनेक पेट्रोलपंपावर वाहनचालकांनी सोमवारी रात्री मोठी गर्दी केली होती. काही पंपांवर ३ किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. काहींनी वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून सकाळपासूनच पंपावर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले आहेत.

दरम्यान, इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संप पुकारल्यामुळे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, अकोला, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांना पानेवाडीतून इंधन पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे इंधनटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.