लैंगिकतेचा, हूशारी व कर्तृत्वाचा काही एक संबंध नाही – शमिभा पाटील

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

लिंग ओळख जाहीर करणा-या व्यक्तीला स्वीकारणारा समाज आणि कुटूंब आपल्याला निर्माण करावयाचा असून, यामध्ये माध्यमांची जबाबदारी मोठी असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस एम्पॉवरमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ट्रान्सजेंडर अॅन्ड मीडिया’ या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना शमिभा पाटील बोलत होत्या.

दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विनोद पाटील होते. यावेळी मंचावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स विभागाचे सल्लागार संजय पवार, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. सुशील अत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी आणि माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर उपस्थित होते.

शमिभा पाटील म्हणाल्या की, ट्रान्सजेंडरसाठी पारलिंगी हा शब्द माध्यमांनी वापरायला हवा. तृतीयपंथी हा शब्द पितृसत्ताकतेतून आलेला आहे. यावेळी त्यांनी लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता याविषयीची संकल्पना स्पष्ट केली. पारलिंगी व्यक्तींच्या बाबतीत जैविक, सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना समजून घेतल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतांना स्वत:ची लिंग ओळख सांगणा-यांची संख्या कमी आहे. तेव्हा अशी लिंग ओळख जाहीर करणा-या व्यक्तीला आदराचे स्थान निर्माण आवश्यक आहे आणि तसा समाज निर्माण करण्यात माध्यमे महत्वाची भूमिका निभावू शकतात असे त्या म्हणाल्या. लैंगिकतेचा आणि हूशारी व कर्तृत्वाचा काही एक संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक पातळीवर सर्वांशी संवाद प्रक्रिया सुरू ठेवण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

संजय पवार यांनी पारलिंगी व्यक्तींबाबतचा कायदा समजून घेणे गरजेचे आहे. असे सांगताना सोशल डिफेन्स मिनिस्ट्रीकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. नवी दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस एम्पॉवरमेंटचे संचालक डॉ.आर गिरीराज यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन त्यांचे प्रतिनिधी म्हणून संजय पवार यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ.विनोद पाटील म्हणाले की, पारलिंगी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात असले तरी समाजात मात्र अद्याप मानाचे स्थान दिले जात नाही. त्यासाठी समाजाचे प्रबोधन करण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. चुकीच्या प्रथांबाबत जनजागृती करणे आणि त्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारीही माध्यमांची आहे असे मत देखील डॉ.पाटील यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ.सुधीर भटकर यांनी कार्यशाळेबाबतची भूमिका विशद केली. उद्घाघाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. गोपी सोरडे यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर अॅड.सुशील अत्रे यांनी ‘ट्रान्सजेंडर संदर्भातील सैवंधानिक तरतूदीआणि महत्वपूर्ण न्यायालयीन निवाडे’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, समाज जोपर्यंत मान्य करीत नाही. तो पर्यंत कायदा करून उपयोग होत नाही. ट्रान्सजेंडरच्या संदर्भात कायदा करण्यात आला असून त्याबाबत अॅड अत्रे यांनी सविस्तर विवेचन केले. एखाद्या व्यक्तीची लैंगिकता हार्मोन्समुळे ठरत असते. तशीच त्या-त्या वातावरणामुळे देखील ठरत असते असेही त्यांनी सांगितले. कायद्यात मूलभूत हक्क आहे. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. त्यामुळे समाजात ट्रान्सजेंडर संदर्भात भेदभाव करता कामा नये असेही ते म्हणाले.

दुसऱ्या सत्रात सामाजिक न्याय व विशेष व सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी ‘ट्रान्सजेंडर आणि शासकीय योजना’ याविषयी मार्गदर्शन करताना शासकीय योजनांची माहिती दिली. ट्रान्सजेंडरच्या तक्रारींचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे हे योजनेचे उद्दिष्टे असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात 140 ट्रान्सजेंडर असले तरी शासकीय पोर्टलवर 94 ट्रान्सजेंडर व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यामुळे त्यांनी नोंदणी केली तर निश्चितपणे शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स विभागाचे सल्लागार संजय पवार, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ.सुधीर भटकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप पार पडला. अध्यक्षीय मनोगतात प्रा.डॉ.डोंगरे यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तींचे अधिकार, संरक्षण यावर प्रकाश टाकला. स्वत:ला समजणे आणि दुस-याला समजून घेणे ही भावना महत्वाची आहे असे सांगून ट्रान्सजेंडर व्यक्तींबाबत समाजाची मानसिकता बदलणे गरजेची आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात प्रा.डॉ.सुधीर भटकर चार ही सत्राचा आढावा घेतला . सूत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे तर आभार डॉ.रोहित कसबे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रंजना चौधरी, प्रकाश सपकाळे, प्रल्हाद लोहार, पंकज शिंपी, कुंदन ठाकरे, भिकन बनसोडे, विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.