अजूनही ट्रान्सजेंडर व्यक्तींविषयी भेदभाव -डॉ.आर.गिरीराज

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
समाजामध्ये प्रत्येकांचा सन्मान करणे आवश्यक आहे, मात्र अजूनही ट्रान्सजेंडर व्यक्तींविषयी भेदभाव केला जातो अशी खंत व्यक्त करून प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागणूक दिली पाहिजे असे मत दिल्ली येथील राष्ट्रीय समाज रक्षा संस्थानचे संचालक डॉ.आर.गिरीराज यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि व्टिट फॉऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय ट्रान्सजेंडर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महामंडलेश्वर आचार्य डॉ.लक्ष्मीनारायण त्रिपाठी, नॅशनल कौन्सिल फॉर ट्रान्सजेंडर संस्थेचे सदस्य आर्यन पाशा, उपसंचालक मनोज हटोज, सल्लागार श्वेता सेहगल, रितिका भारद्वाज, सात्विक शर्मा, संजय पवार आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.आर.गिरीराज म्हणाले की, सर्वसमावेशक सुविधा जोपर्यंत समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचणार नाही तोपर्यंत विकास अशक्य आहे. विकास साधायचा असेल तर रोजगार अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा हा समाज व्यवस्था बळकट करण्यास हिताचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ट्रान्सजेंडर व्यक्तींना व्यक्तींच्या अधिकारांना बळ देण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार देवून त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने ट्रान्सजेंडर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात हमसफर ट्रस्ट, आर.डब्लू,एस, बसेरा, लक्ष्य ट्रस्ट, केशव सुरी फॉऊंडेश, सॉलिडेरीटी फॉऊंडेशन, बी युनिक, युएनडीपी, आयएलओ, इवाई फॉऊंडेशन यांसारख्या पंचवीस कंपन्यांचा समावेश होता. दरम्यान, रोजगार मेळाव्यात 50 पेक्षा अधिक ट्रान्सजेंडर व्यक्तींना नियुक्तीपत्र देण्यात आले, तर 20 ट्रान्सजेंडर व्यक्तींना नियुक्तीपत्र देण्यात येणार असून 31 मार्च 2023 पर्यंत हा रोजगार मेळावा सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी ट्रान्सजेंडर कलाकारांनी संगित नृत्य आणि कविता सादरीकरणाच्या माध्यमातून कलाविष्कार सादर केला.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.