चालत्या ट्रॅक्टरवरुन भोवळ येऊन पडून ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

चालत्या ट्रॅक्टरवर भोवळ आल्याने ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. १५ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोल्हे गावानजीक घडली आहे. घटने प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लासुरे ता. पाचोरा येथील विजय शब्बीर तडवी (३२) हे ट्रॅक्टरद्वारे माती वाहण्यासाठी चालकाचे काम करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असत. दरम्यान आज दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विजय तडवी हे ट्रॅक्टर चालवत असतांना कोल्हे गावाजवळ त्यांना अचानक भोवळ आली आणि ते चालत्या ट्रॅक्टरवरुन खाली पडले. यावेळी त्यांच्या उजव्या हातावरून ट्रॅक्टरच्या ट्राॅलीचे चाक गेल्याने व खाली पडून मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. सदर घटना सावखेडा येथील युवकाच्या लक्षात येताच विजय तडवी यांना रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच विजय तडवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना दुर्दैवी मृत्यू झाला. मयत विजय तडवी यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय तडवी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.