देशाचे भवितव्य तरुणाईच्या हातात

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

देशाचे भवितव्य हे तरुणांवर अवलंबून असते. तरुण हा देशाचा अविभाज्य असा घटक आहे. ज्या राष्ट्रात उत्साही, जिज्ञासू आणि कष्टाळू तरुण आहेत त्या राष्ट्राचा पाया मजबूत आहे, असे समजले जाते. हेच तरुण देशाचा विकास आणि प्रगतीसाठी झटत असतात. म्हणून तरुणाईकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. आजची तरुण पिढी देखील यात आपले विशेष असे योगदान देत आहे, मात्र यातही कुठेतरी कमतरता देखील आहेच, हे नाकारून चालणार नाही. मानवी सभ्यता दिवसागणिक विकसित झाली आहे. प्रत्येक पिढी स्वतःचे विचार, कल्पना घेऊन येते आणि समाजाच्या विकासात योगदान देते. मानवी मन आणि बुद्धिमत्ता कालांतराने विकसित झाली असली, तरी लोकही खूप अधीर झाले आहेत. आजच्या तरुणांमध्ये प्रतिभा आणि क्षमता आहे, परंतु ते आवेगपूर्ण आणि अधीरही आहेत असे म्हणता येईल. आजची तरुणाई नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप उत्सुक आहे.

आजच्या तरुण पिढीला वेगवेगळ्या गोष्टी साध्य करण्याची घाई आहे. मात्र त्या गोष्टी साध्य करण्यासाठी निवडलेले साधन योग्य आहे की नाही ? याकडे ती लक्ष देत नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, स्थापत्य, अभियांत्रिकी अशा सर्वच क्षेत्रात प्रगती झाली असली तरी काळानुरूप गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे हे सत्य आपण नाकारू शकत नाही. भारतात एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६५% तरुण आहेत. आपल्या देशात अनेक हुशार आणि मेहनती तरुण झालेत ज्यांनी देशाचा गौरव केला आहे. भारतातील तरुण पिढी नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी उत्सुक असते. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात आपल्या देशातील तरुणांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मात्र बऱ्याचदा असे देखील कानावर पडते की आजची तरुणाई बिघडते आहे. व्यसन आणि मोबाईलच्या आहारी जातेय. हे देखील तितकेच खरे आहे. अनेक तरुण व्यसनांच्या नादी लागून आपल्यासह देशाचे देखील भवितव्य धोक्यात आणत आहेत. यासाठी लहानपणापासूनच घरातून मुलांना चांगले संस्कार मिळणे आवश्यक आहे.

आजच्या तरुणांमध्ये खूप क्षमता आहे आणि त्यांची सर्जनशीलता आणि क्षमता योग्य दिशेने नेणे, मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य हे शिकवणे, त्यांच्या वयानुसार वेळोवेळी नैतिक शिक्षण देणे, त्यांना वाईट वागणूक किंवा कृतीच्या परिणामांबद्दल सांगणे हे पालक आणि शिक्षकांचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांचे योग्य पालनपोषण करणे जेणेकरून ते आपला आणि देशाचा अभिमान बाळगतील.

Leave A Reply

Your email address will not be published.