तरुणाईच्या कविता

0

सामाजिक बांधिलकी..!

मी म्हणतो सामाजिक बांधिलकी
एक विटाळ आहे.
हीला कोणीही आपलंसं करू म्हणत नाहीये.
कारण प्रसूत झालाय स्वार्थ,
आधीच असह्य असलेल्या
रोजच्या जगण्यासाठी..

कालचा दिवस गेला,
आजचा चालुये, पण
उद्याचं काय? प्रश्न भेडसावतोय..!
भुकेल्यापोटी काही सुचत नाही म्हणतात.
फक्त एकच विचार असतो,
रिकामं पोट कसं भरायचं.? याचा..

हाताला काम नसलं की,
पोटही भरत नाही.
पण डोकं मात्र भरलं जातं,
जगण्यासाठीच्या स्वार्थानं.
आणि इथंच मरते ती तुमची
विटाळ सामाजिक बांधिलकी..!

हिच्यानं पोट नाही भरत,
मन भरतं, समाधानानं.
पण, रिकाम्या पोटाचं काय करायचं?
ते अजूनही भरलं नाहीये..!
मग स्वार्थ मदतीला येतो..
मतलबी सांत्वनदार बनून..!

सामाजिक बांधिलकी मेल्यावर
तिच्या मयताला आलेल्या
सग्या-सोयऱ्यांसारखा..!

राहुल वंदना सुनिल

Leave A Reply

Your email address will not be published.