जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

‘अबकी बार ४०० के पार’ असे आवाहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप तर्फे लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपला जय श्रीराम केला. मुंबईवर मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समावेत पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप तर्फे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे खासदार उन्मेष पाटील कमालीचे नाराज होते. तरी पक्षाचा आदेश मानून काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तथापि खासदार उन्मेष पाटलांचे तिकीट कापल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांकडून त्यांची जी अवहेलना केली गेली, त्यामुळे ते आणखी कमालीचे नाराज झाले. त्यांच्या मनात एकसारखी खरखर होती. ‘चेंज पॉलिटिक्स’ ऐवजी ‘रिवेंज पॉलिटिक्स’ केले जातेय. विकासाच्या राजकारणा ऐवजी विनाशाचे राजकारण केले जातेय. बदल घडवून आणण्याऐवजी बदलाचे राजकारण केले जातेय. अशा परिस्थितीत एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या खासदार उन्मेष पाटलांना कसलेही राजकारणाचे पाठबळ नसताना आमदारकी आणि खासदारकीच्या काळात सेवेचे आणि विकासाचे राजकारण करून विधानसभा आणि लोकसभेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. तथापि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्या पद्धतीने त्यांचे खासदारकीचे तिकीट कापले गेले, त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. गेले १५-२० दिवस अराजकीय विजनवासात त्यांनी राहून विचार विनिमय केला. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची भूमिका आणि म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर भाजपला रामराम ठोकून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यानच्या काळात स्थानिक भाजपचे नेते अथवा कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी कसलाही संपर्क साधला नाही. शिवसेनेत प्रवेश करण्याच्या अंतिम निर्णय घेताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय झालेला होता. त्यामुळे खासदार उन्मेष पाटलांनी गेल्या दहा वर्षात भाजपच्या आमदार व खासदारकीच्या प्रवासाची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी प्रथम खासदारकीचा राजीनामा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे फॅक्सने पाठवून दिला हे विशेष होय. त्याच बरोबर शिवसेनेत प्रवेश करताना जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्याची ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिली. तथापि ती उमेदवारी नाकारून त्यांचे कट्टर समर्थक व जिवलग मित्र पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी देण्याची सूचना केली. ही उद्धव ठाकरेंनी मान्य केली. त्यामुळे आता जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुती अर्थात भाजप आणि महाविकास आघाडी अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गट असा सामना रंगणार आहे.

 

खासदार उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याची दखल भाजपला घेणे आवश्यक आहे. अर्थात भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या पक्ष विरोधात बोलणे याला कितपत महत्त्व देता येईल..! परंतु ज्या पोट तिडकिने खासदार उन्मेष पाटील बोलत होते, त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. “ ‘रिवेंज पॉलिटिक्समुळे माझा बळी घेतला गेला’. सर्व स्तरावर माझे चांगले कार्य असतांना माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे माझा बळी गेला. यातील ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहे. याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु आज शुभ दिवस असल्यामुळे मी त्या शुक्राचार्यांचे नाव घेणार नाही.” असा टोला सुद्धा यावेळी खासदार उन्मेष पाटलांनी हाणला. त्यांचा रोख कोणावर होता हे जळगाव जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. अशा गलिच्छ राजकारणात राहून खितपत पडण्यापेक्षा स्वाभिमानाने जीवन जगावे आणि स्वाभिमानाने राजकारण करण्यासाठी स्वाभिमानी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप विषयी आपली भावना व्यक्त करताना “अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची आता भाजप राहिलेली नाही,” अशी टीका सुद्धा भाजप संदर्भात खासदार उन्मेष पाटील यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या विकासाचे प्रश्न सोडवले जात नाहीत. उत्तर महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. त्या पाण्याचा प्रश्न सोडविला जात नाही. जळगाव जिल्ह्याची मुख्य वाहिनी असलेल्या गिरणा नदीला उध्वस्त केले जात आहे. गिरणा नदीला वाचवण्यासाठी ४५० किलोमीटर गिरणा परिक्रमा पायी यात्रा केली. गिरणा काठावरील अनेक गावात जाऊन तेथील गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तथापि “विकासाच्या राजकारणाला पक्षाकडून साथ मिळाली नाही”, अशी खंतही खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली. एकंदरीत सध्या सत्ताधारी भाजपला सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा खासदार उन्मेष पाटलांचा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल…!

Leave A Reply

Your email address will not be published.