जळकेकर महाराजांचा नाथाभाऊंवर हल्लाबोल…

0

लोकशाही संपादकीय लेख

माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून ते सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात असतात. निसंशय नाथाभाऊ हे भाजपमधील एक ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रात भाजप वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या बदल्यात पक्षाकडून भरभरून मिळाले आहे. भाजपमधील कार्यकर्त्यांना नाथाभाऊंनी घडविले आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते यांच्या मुळेच तयार झालेले आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी नाथाभाऊ म्हणतील तसे वागले पाहिजे, अशी अपेक्षा ठेऊन चालणार नाही. कार्यकर्ते आता स्वतंत्र, स्वयंभू तसेच पक्षात आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आहेत. प्रत्येक जण यासाठी प्रयत्न करतात. त्यांनी तसे प्रयत्न करणे काही गैर नाही. त्यामुळे भाजपमध्ये आलेल्या ‘नव्या पिढीतील तरुण पदाधिकाऱ्यांना तुच्छ लेखणे’ हे योग्य नाही. तसेच आपण ज्या भाजपला वाढविण्याचा प्रयत्न केला, त्या भाजपवर तुमचे ‘प्रतिस्पर्धी निर्माण होऊच नये’ ही नाथाभाऊंची अपेक्षा सुद्धा गैर आहे. पक्षाविषयी, नेत्यांविषयी आणि कार्यकर्त्यांविषयी बोलताना संयम राखणे महत्त्वाचे आहे. नाथाभाऊंचा संयम अनेक वेळा सुटतो आणि ते पोट तिडकीने जरी बोलत असले, तरी ते आरोप प्रत्यारोपाच्या वादात सापडतात. आता भाजप वाढविण्यात तुमचा मोलाचा वाटा असला, तरी आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या पक्षाला तुम्ही काहीही बोलत असाल तर ते आत्ताच्या पिढीतील पक्षाचे पदाधिकारी का म्हणून ऐकून घेतील? नेमके “भाजपला कोणी कुत्र विचारत नाही..!” असे संबोधणाऱ्या नाथाभाऊंना ‘जशास तसे’ उत्तर दिले तर बिघडले कुठे..? जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष जळकेकर महाराजांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नाथाभाऊंवर तोफ डागली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जळकेकर महाराजांनी तुमच्यावर केलेला हल्लाबोल पक्षाच्या हितासाठी योग्यच आहे. “नाथाभाऊंना भाजप उभारणीसाठी जे काही प्रयत्न केले, परिश्रम घेतले त्यापेक्षा जास्त पक्षाने नाथाभाऊंना भरभरून दिले आहे. नाथाभाऊंना आमदारकी, विरोधी पक्षाचे नेतेपद, महसूल खात्यासारखे क्रमांक दोनचे मंत्रीपदसह, बारा खात्यांचे मंत्री केले. सुनेला खासदारकी दिली. पत्नीला दूध संघाचे अध्यक्ष पदासह महानंदाचे अध्यक्ष पद दिले. मुलगी रोहिणी खडसेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद मिळाले. एवढी सर्व पदे खडसे परिवाराला भाजपमुळेच शक्य झाली,” या जळकेकरांनी केलेल्या आरोपात काय चुकीचे आहे? आता “जळकेकर हा कालचा पोरगा अध्यक्ष झाला, म्हणून जास्त बोलायला लागला,” असे म्हणून जर नाथाभाऊंनी खिल्ली उडवली तर ते चुकीचे होईल. ‘नाथाभाऊंना हे समजत नाही’, असे म्हणावे का? हा खरा प्रश्न आहे..!

नाथाभाऊ खडसे हे एक अभ्यासून येथे आहेत. प्रत्येक विषयाचे त्यांना सखोल ज्ञान आहे. ते राजकारणातील एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. परंतु राजकारणात काही पथ्य पाळली पाहिजेत, याचेही त्यांना भान असणे आवश्यक आहे. तथापि ‘मी जे करतो ते बरोबर, इतर करतात ते चुकीचे’ असा त्यांचा हेकेखोरपणा त्यांना नडतो आहे. त्यातून भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि नाथाभाऊ यांच्यातील एकमेकांवरील टीकास्त्र पाहता, ‘कोण चुकीचे कोण बरोबर’ यापेक्षा हा वाद टाळण्यासाठी नाथाभाऊंनी एक पाऊल मागे हटले तर त्यात जेष्ठ नेते म्हणून चुकीचे काय? परंतु जशास तसे उत्तर देण्यामुळे नाथाभाऊंची प्रतिमा मलिन होतेय, याचा त्यांना विचार करणे आवश्यक आहे. खडसे परिवारातील त्यांची सून खासदार रक्षा खडसे यांनी, सासर्‍यांनी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेले असताना सुद्धा भाजपात ज्या एकनिष्ठेने आणि संयमाने आपले स्थान निर्माण केले, त्याचेच फलित म्हणजे पक्षाने रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवारी दिली. खासदार रक्षा खडसेंचा हा आदर्श म्हणावा लागेल. २०१४ साली नाथाभाऊंनी रक्षा खडसेंना उमेदवारी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. परंतु आता सासरे भाजपात नसतानासुद्धा रक्षा खडसेंनी जी उमेदवारी मिळवली, त्याचे श्रेय रक्षा खडसेंनाच द्यावे लागेल. आता नाथाभाऊंची प्रकृती सुद्धा साथ नाहीये. त्यांनी आता सल्लागाराची भूमिका पार पाडावी. कन्या रोहिणी खडसेंना भवितव्य मोठे आहे. आज एका पक्षाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत. उठ सुट ‘आरेला कारे’ आरोपाचे प्रत्यारोपाने खंडन करीत बसण्यात आपली शक्ती खर्च करू नये, एवढेच या निमित्ताने सुचवावेसे वाटते…!

Leave A Reply

Your email address will not be published.