विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणूकीची प्रक्रिया सुरू करावी – विद्यापीठ विकास मंचची मागणी

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांची मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाली आहे. नवीन प्राधिकरण स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ नियमानुसार मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या मतदार नोंदणीची कार्यवाही देखील सुमारे दीड महिन्यांपूर्वी पूर्ण झाली आहे. तरी या नोंदणी झालेल्या सदस्यांची पडताळणी व यादी प्रसिद्ध करण्याच्या प्रकियेत दिरंगाई होत असून सदर प्रक्रिया अधिक वेगाने राबवावी या बाबत मा.कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले.

मागील प्राधिकरणांचा कालावधी पूर्ण होऊन अडीच महिने पूर्ण झाले आहेत. तसेच नवीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन आता सुमारे दीड महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. किमान आता पर्यंत निवडीची पुढील प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. विद्यापीठाचे कामकाज महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार व लोकशाही पद्धतीने चालणे गरजेचे आहे. पण तशी कार्यवाही अद्यापही होतांना दिसत नाही. ही कामातील दिरंगाई असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. विद्यापीठ प्राधिकरणांच्या सर्वच निवडणूकांची प्रत्यक्षात कार्यवाही केव्हा सुरू होईल व केव्हा पूर्ण होईल याबाबत विद्यापीठ प्रशासनाने माहिती देणे आवश्यक असून, प्राधिकरणांचा कालावधी बाबत माहिती उपलब्ध होत नसल्याने उलटसुलट चर्चा विद्यापीठ क्षेत्रात होतांना दिसत आहेत.

विद्यापीठातील काही घटकांचा आपला हेतू साध्य न झाल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत काही संघटनांना हाताशी धरून विद्यापीठाची बदनामी करीत आहेत व अपूर्ण माहितीच्या आधारे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत असल्याचे आमचे मत आहे. आपल्या विद्यापीठात कधीही व कुणीही दबाब टाकून कोणतेही काम करत नाही तर सर्व कामे नियमानुसारच होत असतात हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. तरीही काही स्वार्थ दुखावलेली मंडळी आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी असा उपद्व्याप करीत असल्याचे दिसून येत आहे. हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार म्हटला पाहिजे. तसेच योग्य माहिती विद्यापीठ प्रशासनाकडूनच मिळाली पाहिजे. पण अपूर्ण व संभ्रम निर्माण करणारी माहिती समाज माध्यमातून प्रसारित होते हे चुकीचे आहे. अशी माहिती प्रसारित करण्यामागे कोण घटक आहेत, याचाही वरिष्ठ यंत्रणेने शोध घेऊन त्यांचेवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या विद्यापीठात पुढील महिन्यात “आव्हान” या  राज्यस्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा सर्वात महत्त्वाचा व मोठा उपक्रम आहे आणि या कालावधीत आपल्या विद्यापीठातील एकही प्राधिकरण अस्तित्वात नाही हे अयोग्य आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणात समाज घटकांचा सहभाग होत असतो. पण या महत्वाच्या काळात प्राधिकरण अस्तित्वात नसणे म्हणजे प्राधिकरणातील समाज घटकांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग टाळण्याचा किंवा लांबणीवर टाकण्याचा हेतू तर नाही ना अशीही शंका उपस्थित होऊ शकते. या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. या निवडणुक प्रक्रियेस जर आता उशिर झाला तर स्वाभाविकपणे या पुढील प्रक्रियाही लांबत जाणार आहे हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. तरी प्राधिकरण निवडीची पुढील प्रक्रिया त्वरित सुरू होऊन वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.

यावेळी विभाग प्रमुख विद्यापीठ विकास मचं तथा मा.सिनेट सदस्य नितीन ठाकुर, मा.व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक पाटील, विवेक लोहार, मा.सिनेट सदस्य- अमोल मराठे, दिनेश नाईक, नितीन झाल्टे, मनिषा चौधरी, अमोल पाटील, दिनेश खरात, कार्यालय प्रमुख योगेश पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.