राज्यावर पुढील पाच दिवस आस्मानी संकट

0

मुंबईः महाराष्ट्रात मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, रायगड जिल्ह्यात सावित्री नदीदेखील इशारा पातळीवरुन वाहत आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ) तुकड्या कोकण आणि विदर्भात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
ओडिशा जवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी छत्तीसगडवर स्थिरावले. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, मान्सूचा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) सध्या त्याच्या सर्वसाधारण स्थानापासून दक्षिणेला आहे. ही स्थिती राज्यात सर्वदूर पावसासाठी अनुकूल असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ५ जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात ३०-४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. याचबरोबर ६ ते ७ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.