धरण उशाला अन् कोरड घशाला

0

जळगाव जिल्ह्यात धरणामध्ये, विहिरीमध्ये पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध असताना जिल्ह्यातील नशिराबाद, वरणगाव, बोदवड आणि धरणगाव या मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना यंदा तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद हे सर्वात मोठे असलेले शहर 50 हजार लोकसंख्या परंतु 12 ते 13 दिवसानंतर नळांना पाणी येते. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव हे सर्वात मोठे शहर वरणगावची लोकसंख्या सुमारे पन्नास हजाराच्या घरात आहे. या ठिकाणी सुद्धा वरणगाव करांना चौदा ते पंधरा दिवसानंतर नळाला पाणी येते. जिल्ह्यातील बोदवड हे तालुक्याचे शहर मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शहर. बोदवडकरांना दहा ते बारा दिवसानंतर नळाला पाणी मिळते. हीच अवस्था पालकमंत्र्यांनी पाणी पुरवठा मंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणांची आहे. नशिराबाद, वरणगाव, बोदवड आणि धरणगाव या शहरांमध्ये यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भरपूर पाणी साठा उपलब्ध असताना पाण्याच्या टंचाईने दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. ही केवळ अन् केवळ पाण्याची चुकीची वितरण व्यवस्था होय. नशिराबादकरांना वाघुर धरणाजवळील बेळी आणि फर्दापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या मे महिन्याच्या खडक उन्हाळ्यात वारंवार विद्युत पंपाच्या नादुरुस्तीमुळे नशिराबाद करांना 12 ते 14 दिवसांनंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. नशिराबादकरांचीही हंडाभर पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

हीच अवस्था वरणगाव शहराची देखील आहे. तापी नदीतून अगदी 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पाणी असताना वरणगाव मध्ये मात्र 12 ते 14 दिवसांनंतर नळाला पाणी येते. पिण्याच्या पाण्यासाठी भाजपतर्फे भव्य जन आक्रोश मोर्चा काढून महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेतर्फे सुद्धा पाहण्यासाठी आवाज उठवून सावरासावर केली जाते. तथापि वरणगाव करांसाठी वितरित केले जाणाऱ्या पाण्याचे नियोजन चुकते याकडे मात्र कुणी बघायला तयार नाही. बोदवड हे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण या ठिकाणी ग्रामपंचायत जाऊन आता नगरपंचायत कार्यान्वित झाली. तथापि पिण्याच्या पाण्यासाठी मात्र येरे माझ्या मागल्या असेच सुरू आहे. दहा ते बारा दिवसानंतर बोदवड घरांना नळ पाणी मिळते. धरणगाव हे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आणि पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील तालुक्याचे ठिकाण. येथे आता आठ ते दहा दिवसानंतर नळाला पाणी दिले जाते. उन्हाळ्याच्या आधी पावसाळ्यात धरणगाव 20-20 दिवसानंतर पाणी मिळायचे. काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे असे झाले रे झाले की धरणगाव करांना 20 दिवसांनंतर मिळणारे पाणी एक दिवस आड उशिरा मिळाले तर धरणगाव शहरात हाहाकार होत असे. लागलीच मोर्चे, आंदोलन, नगरपालिकेवर भडिमार होत असे.

एकंदरीत वरील चार शहरांमध्ये पाण्याची टंचाई असल्याने असल्याचे कारण धरणात पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याचे कारण नाही. तर पाण्याच्या वितरण व्यवस्थेतील दोषामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बोदवडकरांसाठी पाणीटंचाई गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाचवीला पुजलेली आहे. बोदवड पासून वीस किलोमीटर अंतरावर तापी पूर्णा नदीच्या संगमावर ओडिओ पाणी पुरवठा योजना 1993 मध्ये कार्यान्वित झाली या ओडिओ योजनेअंतर्गत 32 गावांना पाणी पुरवठा होतो. याखेरीज ओव्हरसीज डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंग्लंड स्थित सेवाभावी संस्थेने सुरू केलेली योजनेची पाईपलाईन व इतर बाबी 2006 साली कालबाह्य झाल्या. तशा आशयाचे पत्र इंग्लंडहून बोदवड ग्रामपंचायतीला प्राप्त झाले. तथापि 2006 पासून ते आजतागायत म्हणजे सोळा वर्षे झाली त्या कालबाह्य ओडिओ योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. ओडिओ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे मार्फत चालवण्यात येत होती. तथापि मजिप्र च्या अकार्यक्षमतेमुळे योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. तथापि 32 गावाच्या ग्रामपंचायतीकडून विजेचे बिल भरणे शक्‍य नसल्याने अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ही पाणीपुरवठा होऊ शकला नाही. या योजनेसाठी वीज बिलाचा भरणा न करणे ,कालबाह्य पाईप लाईन मुळे वारंवार पाण्याची गळती होणे आणि जॅकवेल कालबाह्य झाल्यामुळे पाणीपुरवठा करणे शक्य नाही. हे तीन शाप या पाणीपुरवठ्याला लागले असल्यामुळे बोदवड सह 32 गावांसाठी पाणी असूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. परंतु ही कालबाह्य झालेली योजना योजनेला पर्यायी योजना देण्याचा आज पर्यंत कुठलाही प्रयत्न झाला नाही. एकनाथ खडसे हे गेल्या वर्षभरापासून मुक्ताईनगर मतदार संघातून नेतृत्व करीत असले तरी या योजनेकडे मात्र त्यांनीही कानाडोळा केलेला दिसतो. यामागे इंगित काय आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही. आता शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची त्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु राजकारणाच्या फेऱ्यात ओडिओ योजना कशीबशी रडत रडत चालू आहे. विद्यमान पालकमंत्री हे पाणीपुरवठा मंत्री असल्याने ओडिओ योजनेचा नव्याने पुनर्विचार करावा ही अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.