पुतण्याचा अपघाती मृत्यू ऐकून काकूनेही सोडले प्राण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा – शहरातील हनुमान नगरातील एका २७ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झाला. ही घटना ऐकून तरुणाची काकू यांना जबरदस्त धक्का बसल्याने त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना नातेवाईक उपचारासाठी जळगाव येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. या घटनेमुळे सोनार कुटुंबावर मोठा आघात झाला व हनुमान नगरवासिय देखील सुन्न झाले. गुरूवारी एकाच दिवशी काकू व पुतण्याची अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंग सोनार कुटुंबियांवर आला. हे पाहून अनेकांचे मन हेलावले.
ऐन मकरसंक्रातीच्या तोंडावर घडलेल्या दु:खद घटनेची माहिती अशी की हनुमान नगरात दादाभाऊ मोरे व त्याचे दोन्ही भावांचे कुटुंब एकाच ठिकाणी राहतात. ११ जानेवारी रोजी दादाभाऊ मोरे हे त्यांचे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी येथे गेले होते. बुधवारी रात्री ९ वाजता उत्तरकार्य आटोपुन आल्यानंतर त्यांचा लहान मुलगा किरण सोनार (वय २७) हा कामानिमित्त शहरातील दुसर्यां भागाकडे रेल्वे लाईन ओलांडून जात असतांना त्याला गाडी क्रं. १५५४८ मुंबई हुन जळगांवच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या प्रवाशी रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती रेल्वेचे लोको पायलट जे. एच. देवरे यांनी वाॅकी टाॅकीद्वारे पाचोरा रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक यांना दिल्यानंतर त्यांनी सदरची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिली. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिकाचालक अमोल पाटील यांच्या सह घटनास्थळी दाखल होवून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर किरण सोनार यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे.
किरणच्या मृत्युची बातमी कुटुंबाच्या सदस्यांना सर्वांनी आक्रोश केला. किरणची आजी, वडिल, आई, काका व भाऊ बहिण यांनी त्याच्या अचानक जाण्याने करित असलेल्या आक्रोशात त्याची काकु उषाबाई मन्नु सोनार (वय – ४०) यांना ह्रदयविकाराचा झटका आला. सुरुवातीला त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांनी पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना जळगाव घेऊन जात असताना रस्त्यातच उषाबाई यांची प्राणज्योत मालवली.
रात्री उशीरा घडलेल्या या दोन घटनांमुळे हनुमान नगर परिसरात शोककळा पसरली. संपुर्ण हनुमाननगर राञभर जागीच होते. १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उषाबाई यांचा मृतदेह आणला गेला व तासाभरात किरणचा मृतदेह आणला. काकु व पुतण्या या दोघांच्या अंतयाञीची तयारी एकाच वेळी करून ट्रॅक्टरवर दोघांची अंतयाञा काढण्यात आली.
किरण हा घरातील कर्ता मुलगा होता. तो तारखेडा रस्त्यावर चहा, नाष्ट्याचे दुकान चालवित होता. त्याने एक दिवसापुर्वीच रिक्षा विकत घेतली होती. त्याच्या पश्चात आजी, आई, वडिल, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. तर किरणची काकु उषाबाई ही सुध्दा त्यांच्या घरातील करती महीला होती. त्या शहरातील एका दवाखान्यात काम करून आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवत होत्या. पतीचे एका अपघातात पायाचे आॅपरेशनही त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. काकु व पुतण्या यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने हनुमाननगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.