लोकशाही न्यूज नेटवर्क
कोलकाता- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (१२ जानेवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन खेळला गेला. टीम इंडियाने ४ गडी राखत शानदार विजय संपादन केला आणि यासह मालिकाही २-० ने खिशात घातली. मात्र सामन्यात श्रीलंकन गोलंदाजांनी विजयासाठी फार झुंजवले. भारताचे पहिल्या १५ षटकात ४ गडी बाद करत अडचणीत आणले. पण केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी ७५ धावांच्या भागीदारीने विजय मिळवून दिला. केएल ने दमदार अर्धशतक केले, तो ६४ धावा करून नाबाद राहिला.
श्रीलंकेने ठेवलेल्या २१६ धावांचा पाठलाग करताना भारताची घसरगुंडी झाली. भारताने पहिल्या १५ षटकात ४ गडी गमावले आणि त्यामुळे श्रीलंकेला सामन्यात येण्याची संधी दिली. कर्णधार रोहित शर्मा १७ तर सलामीवीर शुबमन गिल केवळ २१ धावा करून बाद झाले. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील शतकवीर विराट कोहली अवघ्या ४ धावांवर लाहिरू कुमाराच्या शानदार इनस्विंग चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने २८ धावांचे योगदान दिले, मात्र राजिथाने त्याला पायचीत केले. मग यष्टीरक्षक केएल राहुल आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पांड्या ३६ धावांवर असताना त्याला करुणारत्नेने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अक्षर पटेल फार काही करू शकला नाही त्याने २१ धावा केल्या. लाहिरू कुमारा आणि चामिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले तर धनंजय डी सिल्वा आणि कसून राजिथाला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यातून संघात पुनरागमन करत असलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेला २१५ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला मोहम्मद सिराजने आणि उमरान मलिकने प्रत्येकी ३ आणि २ बळी घेत मदत केली. श्रीलंकेला स्वस्तात सर्वाबाद करण्यात या तीन गोलंदाजांव्यतिरिक्त अक्षर पटेलचे महत्त्वाचे योगदान होते. अक्षरने तीन झेल घेतले आणि एक गडी देखील बाद केला.
गुवाहाटी येथील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ ईडन गार्डन येथे मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला. भारताने या सामन्यासाठी युजवेंद्र चहल याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली. श्रीलंकेला पुन्हा एकदा या सामन्यात सुरुवात देण्याचा प्रयत्न अविष्का फर्नांडो व पदार्पण करणाऱ्या नुवानिदू फर्नांडो यांनी केला. अविष्का वेगवान २० धावा काढून बाद झाला. त्यानंतर नुवानिदू व कुशल मेंडीस यांनी ७३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. श्रीलंकेने पुढील पाच बळी केवळ २४ धावांमध्ये गमावले. पुढील सामना रविवारी तिरुअनंतपुरमला १५ जानेवारी रोजी होणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.