विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य चौकांवर राहणार पोलिसांची करडी नजर

दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या- पोलीस अधीक्षक एम राजकुमार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्सव करताना आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यायला हवी. तरच प्रत्येक उत्सव हा आनंदाने साजरा करता येईल. त्यामुळे शहरातील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन नागरिकांनी सण उत्सव साजरे करावे असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी श्री गणरायाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या कार्यालयात केले. ते सायंकाळी लोकशाही कार्यालयातील गणरायाच्या आरतीसाठी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक राजकुमार म्हणाले, जळगाव शहरात २८ सप्टेंबर शुक्रवार रोजी श्री गणरायाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक निघून गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात पोलीस प्रशासन मोठ्या जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असून शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांना सुरक्षा मिळावी यासाठी एसआरपीएफ टीम, १६०० होमगार्ड, ३०० रिक्रुट आणि अधिक मदतीसाठी २०० फॉरेस्ट गार्ड देण्यात आले आहेत.

यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक राजकुमार म्हणाले, दरम्यान शहरातील संपूर्ण पोलीस मनुष्यबळ हे यासाठी कार्यरत आहे. यात एक जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आवश्यक त्या सुविधा योग्य त्या ठिकाणी पुरवणे ही माझी जबाबदारी आहे. कारण २८  तारखेला गणेश विसर्जनानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी होणार आहे. त्यामुळे सलग बंदोबस्तासाठी पोलिसांना तैनात राहावे लागणार असून नागरिकांनी समजदारीने काम घेऊन आपल्या दिलेल्या अटी शर्तींना स्वीकारून सण साजरे करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

जळगाव पोलिसांसाठी सप्टेंबर महिना हा एक प्रकारे टेस्टिंग टाईम ठरला. या महिन्यात शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सभा तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रम पोळा आणि गणपती उत्सव असे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम जिल्हा पातळीवर राबवले गेले. त्यातले शेवटचे असे २८ तारखेचे श्री गणरायाचे विसर्जन आणि २९ तारखेचे ईद-ए-मिलाद हे कार्यक्रम अद्याप होणे बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात प्रभावी पोलीस नियोजन राबविण्यात आले आहे.

विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान यासाठी ठरवून दिलेल्या मुख्य मार्गावर महत्त्वाच्या अशा तीन चौकात पोलिसांनी सिग्नल सिस्टीम लागू केली आहे. त्यामध्ये प्रत्येक मंडळाला आपले सादरीकरण करण्यासाठी विशिष्ट वेळ दिली जाणार असून सिग्नल ग्रीन झाल्यावर प्रत्येक मंडळाला तिथून निघावेच लागेल. जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांततेत मिरवणूक पार होईल.

त्याचप्रमाणे एक दिवसा अगोदर ड्रोन कॅमेरा द्वारे या मुख्य विसर्जन मार्गावर करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे छेडखानी करणारे, गुन्हेगारी स्वरूपातील संशयित, पाकीट मार त्याचप्रमाणे शांतता भंग करणाऱ्या संशयीतांवर बारीक नजर ठेवून मिरवणुकीला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली.

वास्तविक हा कठीण काळ हाताळण्यासाठी पोलीस पूर्णपणे प्रशिक्षित असतात. खरंतर असा काळ हा आमच्यासाठी एका कार्यशाळेप्रमाणे असतो. खरंतर कार्य बजावत असताना या काळात आपोआपच सर्वांना एनर्जी मिळत असते. २८ तारखेला बारा वाजेपर्यंत गणेश विसर्जनाची मिरवणूक असून त्यानंतर नागरिकांना सुरक्षित घरी पाठवण्याची जबाबदारी राहील. यात पोलिसांना रात्री अडीच तीन सहज वाजतील. त्यानंतर तात्काळ सकाळी सात वाजेपासून सुरू होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून आपल्याला दिलेल्या वेळेत आपले सण उत्सव साजरे करावे असे जाहीर आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.