सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार !

बारामतीला दोन खासदार : दादांकडून कुटुंबाला झुकते माप

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या हायव्होल्टेज लढतीत पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांच्या नावाची निवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. नणंद सुप्रिया सुळेंकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार मागच्या दाराने संसदेत जातील.

राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. प्रफुल पटेलांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांची वर्णी लावण्यात येणार आहे. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नेतृत्त्वाकडे केली होती. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुनेत्रा पवार बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात दीड लाख मतांनी पराभूत झाल्या. त्यानंतर पक्षाने त्यांची निवड राज्यसभेसाठी केली आहे.

विशेष म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार देखील राज्यसभेसाठी उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी फेब्रुवारीतच प्रयत्न केले. त्यावेळी प्रफुल पटेलांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पार्थ पवारांना राज्यसभेवर काम करण्याची इच्छा होती. त्यावेळी सुनेत्रा पवार बारामतीमधून लढणार असल्याचे निश्चित झाले होते. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना लोकसभेचे तिकीट, राज्यसभेवर संधी दिल्यास पक्षात आणि जनतेत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याने पार्थ यांना त्यांच्या मागणीचा विचार नंतर करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.