शिवरायांची वाघनखे भारतात नक्की येणार!

मी ‘तिकडे’ गेलो, तरी अडचण नाही : सुधीर मुनगंटीवारांची ग्वाही 

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

यंदाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर होणे अपेक्षित होते. मात्र विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्याला या परीक्षेत 100 पैकी शून्य गुण मिळतील, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच यंदाची लोकसभा निवडणूक ही मुद्द्यांवर नाही, तर गुद्द्यांवर चालली. महाविकास आघाडी हे राजकारण नासविणारे नवे केमिकल राज्याच्या राजकारणात जन्माला आले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्याचवेळी राज्यातील खालावलेला मतदानाचा टक्का चिंताजनक असून त्यासाठी दोषपूर्ण मतदार याद्या, मतदान केंद्रांचे विस्तारीकरण आणि मतदारांची उदासीनता कारणीभूत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक बाबींवर भाष्य केले. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत घोषणा करताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लक्षात घेता ठरलेल्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. वाघनखे दर्शनासाठी येणार हे नक्की असून त्याचा प्रारूप तयार करण्यात आला आहे. मी जरी ‘तिकडे’ (दिल्लीला) गेलो, तरी यात काहीही अडचण येणार नाही,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. ‘काँग्रेसने त्यांची सत्ता असताना आणि उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना काय केले हे सांगताच आले नाही. म्हणून यंदाची निवडणूक ही मुद्द्यांवर नाही, तर गुद्द्यांवर आली. तर त्याचवेळी महाविकास आघडीने त्यांच्या भाषणात किती शिव्या, किती अपशब्द वापरले हे तपासून घ्या, याची सुरुवातही महाविकास आघाडीनेच केली,’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

राज्यात 75 नाट्यचित्रगृहे उभारणार

मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची तक्रार अनेकवेळा केली जाते, ही तक्रार दूर करण्यासाठी आणि राज्यातील नाट्यगृहांची परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरच राज्यात 75 नाट्यचित्रगृह उभारण्याचा विचार सरकार करीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत सकारात्मक असल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. प्रथम सत्रात सिनेमा आणि द्वितीय सत्रात नाटक पाहण्याची सुविधा या नाट्यचित्रगृहाच्या माध्यमातून केली जाणार आहे. सध्या या नाट्यचित्रगृहाच्या आसन व्यवस्थेबाबत एकमत झाले नसून यासाठी आयआयटीची मदत घेतली जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही

भारत नावाच्या राष्ट्राला जर खरेच ‘महा’करायचे असेल तर महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले. ‘महाराष्ट्र चुकीच्या नेत्यांच्या हातात गेला तर फक्त आणि फक्त राजकारण होण्याची भीती आहे. महाराष्ट्राचे नागरीक फक्त भावनेच्या आणि जातीच्या आधारावर मतदान करणार नाहीत. ते देशभक्तीच्या भावनेने मतदान करतील,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काही राजकीय पक्ष धर्माकडे फक्त मतांसाठी पाहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.