काय आहे, स्टार्टअप स्टार्टअप आणि स्टार्टअप… (भाग १)

0

लोकशाही विशेष लेख

नुकतच नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ सुरू झालंय. प्रत्येक येणाऱ्या नवीन वर्षी माणसाला डोक्यात एक नवी कल्पना येते, ती म्हणजे यावर्षी चांगलं मोठं आणि झटपट असं काय करता येईल? फास्ट पैसे कसे कमवता येतील? माझी आर्थिक प्रगती कशी करता येईल? ही आपल्यासारख्यांची सर्वसामान्य मानसिकता होय. फास्ट इन्कम कमावण्याचा आपण नेहमीच विचार करत असतो. तेव्हा पहिला विचार येतो तो म्हणजे स्टार्टअप (startup) स्टार्टअप आणि स्टार्टअप…

स्टार्टअप मध्ये नेहमीच काही ना काही नवीन करता येतं. विशेष म्हणजे फास्ट करता येतं अशी आपली धारणा असते. कारण याआधी आपण कुठेतरी वाचलेलं, ऐकलेलं किंवा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं असतं की, अमुक अमुक व्यक्ती स्टार्टअप सुरू करते आणि अल्पावधीतच तिचा प्रचंड विकास होऊन ती भरभराटीला आलेली असते. अशी अनेक उदाहरणं आपल्या पाहायला मिळतात. मग आपल्याही डोक्यात विचार येतो की आपण काहीतरी नवीन स्टार्टअप सुरू करावा आणि यांच्यासारखं मोठं व्हावं. पण नेमकं स्टार्टअप म्हणजे काय हो? असाही प्रश्न प्रत्येक वेळी नव्याने निर्माण होत असतो. स्टार्टअपच्या नावाखाली जगात असं नेमकं काय सुरू झालंय की एखादा लहान वयातलाही स्वतःचा स्टार्टअप सुरू करून यशस्वी होऊ शकतो आणि वयोवृद्ध व्यक्ती देखील स्टार्टअप सुरू करून त्या वयातही आर्थिक दृष्ट्या बळकट होऊ शकतो! हे नेमकं चाललंय तरी काय? याच कुतूहलातून आपल्या मनात निर्माण होतो तो प्रश्न म्हणजे स्टार्टअप म्हणजे नेमकं काय?

हाच सर्व गोंधळ आणि किचकट वाटणारा प्रश्न आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी या विशेष सदरातून आपल्याला स्टार्टअप विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये वाचायला मिळणार आहे. जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये असलेल्या संकल्पना समजून घेऊन त्या प्रत्यक्ष जीवनात वापरू शकाल आणि स्वतःचा सोबतच राज्याचा आणि देशाचा विकास घडवू शकाल. या विशेष लेखाच्या सदरातून आपण स्टार्टअप म्हणजे काय? त्याची प्रक्रिया कशी असते? त्याचे फायदे काय? तोटे काय? याची इत्यंभूत माहिती मिळवणार आहोत.

भारत हा फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनोमी अर्थात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगाच्या आलेखात सहाव्या क्रमांकावर आहे. असं म्हटलं जातं की 2030 पर्यंत भारत हा जगातील तिसरा असा अर्थव्यवस्थेने समृद्ध असलेला देश म्हणून ओळखला जाणार आहे . हे सर्व ऐकत असताना प्रत्येकाला एक सर्वसामान्य प्रश्न पडतो की, आपण जगातली तिसरी मोठी प्रगत अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येऊ हे खरं असलं, तरी यात मी कुठे असणार आहे? म्हणजे यातून नेमकं मला काय मिळणार आहे? अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात माझा छोटासा वाटा आहे, पण यातून मला नेमकं काय मिळणार?

हा खारीचा वाटा सिंहाचा वाटा कधी बनणार? आणि २०३० च्या महासत्ता अर्थव्यवस्थेचा मी देखील एक महत्त्वाचा भाग कसा होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यासाठी नेमकं काय काय लागेल? कोणती वाट निवडावी लागेल? कशा पद्धतीने प्रयत्न करावे लागतील? आणि या प्रयत्नांसाठी योग्य मार्गदर्शन कसे मिळेल? हा ही प्रश्न निर्माण होतोच. स्टार्टअप निवडताना तो कसा निवडायचा त्यात कशा पद्धतीने प्रयत्न करायचे संशोधन कसं करायचं? कोणतं माध्यम निवडायचं? या सर्वांची इत्यंभूत माहिती या सदरात आपण जाणून घेणार आहोत.

स्टार्टअप या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे असते ती म्हणजे संकल्पना. कोणत्याही संकल्पनेतून अर्थात आयडिया मधून स्टार्टअपला सुरुवात होत असते. ही आयडिया फक्त तज्ञ लोकच देऊ शकतात हा गैरसमज आधी दूर करायला हवा. कारण एखाद्या लहान मुलाला सुचलेली कल्पना देखील एखादा स्टार्टअप निर्मितीसाठी फार मोठा हातभार लावू शकते. अशी अनेक उदाहरणे स्टार्टअप क्षेत्रामध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आयडिया अर्थात संकल्पना निर्माण होणे, ती संकल्पना विचारात घेत असताना अनेक समस्या निर्माण होणे आणि या समस्यांचे उत्तर शोधताना निर्माण होणारी अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने स्टार्टअप चा मूळ पाया आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

प्रॉब्लेम आणि त्याचे सोल्युशन इतकी साधी आणि सरळ अशी स्टार्टअप ची संकल्पना प्राथमिक स्वरूपात लक्षात घेता येईल. स्टार्टअप म्हणजे काही जादूची कांडी नाही की फिरवली आणि काही चमत्कार होऊन आर्थिक प्रगती झाली. असं काहीही होत नाही. एखादी संकल्पना निर्माण होते. त्यातून समस्या निर्माण होतात आणि त्या समस्येचे उत्तर शोधताना तुमचा स्टार्टअप विकसित होत असतो. असे स्टार्टअपचे स्वरूप म्हणता येते. तसंच तुम्हाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. मात्र त्यात काहीनाकाही कमतरता निर्माण होत असतात. या कमतरता पूर्ण करण्यातून किंवा त्यात सुधारणा करण्यातून देखील स्टार्टअप विकसित होत असतो.

वास्तविक हे सर्व करण्यासाठी चिंता आणि चिंतन या दोघी गोष्टी फार गरजेच्या असतात. कारण आपण सुरू करत असलेला स्टार्टअप कशा स्वरूपाचा असेल? थोडक्यात सांगायचं तर त्याचा विस्तार किती असेल? त्याचे क्षेत्र किती असेल? त्यातून किती लोकांना प्रभाव पडणार आहे? याचा अभ्यास देखील गरजेचा ठरतो. मात्र सकाळी चहा पितांना माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी आता त्याचा स्टार्टअप सुरू करणार, असं काहीही नसतं. कारण एखादी संकल्पना निर्माण झाल्यानंतर तिच्यावर दीर्घकाळ चिंतन करून त्यातून योग्य प्रक्रियेची निर्मिती होत आहे का? याचा अभ्यास करून मगच त्या स्टार्टअप ची सुरुवात होते.

डोक्यात आलेल्या कल्पनेला सत्यात उतरवण्याच्या आधी किंवा स्टार्टअप सुरू करण्याच्या आधी त्याचं आर्थिक गणित देखील समजून घ्यावं लागतं. कारण डोक्यात आलेली कल्पना ही प्राथमिक स्वरूपातील एक कल्पना असते. तिच्यावर अंमलबजावणी करायची झाल्यास त्याला किती वेळ लागेल, किती खर्च लागेल, किती मनुष्यबळ लागेल किंवा कोणत्या प्रकारच्या प्रक्रियांचा वापर करून ती कल्पना उदयास येईल, याचा अभ्यास देखील असणं अत्यंत गरजेचं आहे.

एखादी कल्पना स्टार्टअप च्या हिशोबाने असली तरी जर त्यातून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर तो स्टार्टअप सुरुवात सुरू करून काहीही फायदा नसतो. कारण त्यातून फक्त नुकसान होणार असेल तर त्या स्टार्टअपला निर्माण करून काहीही उपयोग नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्याला समाजात पाहायला मिळतात. काही उदाहरणे ही यशस्वी स्टार्टपची असतात तर काही अपयशी स्टार्टअपची असतील. आपल्याला या दोन्ही प्रक्रियांचा अभ्यास करून घेणं, त्या लक्षात घेऊन त्यावर योग्य विचार करणं गरजेचं आहे. यातूनच तुमच्या स्टार्टअपच्या निर्मितीत येणाऱ्या समस्यांवर योग्य तोडगा काढता येऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही यशस्वी आणि अयशस्वी स्टार्टअपची संकल्पना देखील विचारात घेणे गरजेचे आहे.

एकंदरीत स्टार्टअप ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला या सदरातून संपूर्ण अशी माहिती पुरवणार आहोत. जेणेकरून योग्य अशा माहितीच्या आधारे तुम्ही एक यशस्वी स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रयत्न करू शकाल. यामध्ये तुम्हाला अगदी स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी निर्माण होणाऱ्या कल्पना कशा मिळवायच्या, कुठून मिळवायच्या, त्यांच्यावर योग्य अंमलबजावणी कशी करायची इथपासून सुरुवात करणार आहोत. चला तर कोणत्याही शंका कुशंका मनात न ठेवता स्टार्टअप विषयी जाणून घेऊया आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावत स्वतःचाही विकास घडवून आणूया.

 

पंकज दारा
ग्लोबल स्टार्ट अप मेंटॉर
9823354105
[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.