धक्कादायक: बापानेच मुलाला संपवले, कोल्ड्रिंकमध्ये विष..

0

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलांना कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून जीवे मारल्याचे धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे.

मुलाचा मृतदेह आढळला 

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 13 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एक लहान मुलाचा मृतदेह आढळला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होतं. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू (वय 14, रा. भवानी पेठ सोलापूर) अशी पटली.

राग मनात धरून 

पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडिलांनी खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की, मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांच्या सतत खोड्या काढायचा. त्याच्या शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या काढणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरून त्यांनी त्याला थम्सअपमध्ये सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून जिवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पोनि जगताप हे करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.