शिव महापुराण कथेस्थळी महिला चोरट्यांची हातसफाई ; अनेक महिलांचे मंगळसूत्र लांबविले

0

मध्यप्रदेशातील काही संशयित महिलांना घेतले ताब्यात

जळगाव :- पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेच्या ठिकाणी पहिल्याच दिवशी महिला चोरट्यांनी हात सफाई केल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाविक महिलांच्या सोन्याच्या पोत चोरी केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील एकूण २७ संशयित महिलांना स्थानिक गुन्हे शाखेकडून पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. भाविकांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम  उशिरापर्यंत सुरू होते.

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजीपासून कानळदा रोडवरील वडनगरी फाट्यावर करण्यात आले आहे. कथेचा लाभ ३ लाखांपेक्षा अधिक भाविक घेत आहेत. दरम्यान, या कथेसाठी 1200 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला असून सुरक्षाकामी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडत आहे. पहिल्याच दिवशी चोरटयांनी देखील कथेला उपस्थिती लावली असल्याचे दिसून आले आहे. काही संशयित महिलांनी भाविक महिलांच्या सोनसाखळ्या, मंगलपोत ओढून चोरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

कथास्थळी एका महिलेची पर्स चोरीला गेली. मात्र त्यातील मोबाईल खाली पडल्याने तो एकाला सापडला. त्याने संपर्क साधून तो परत दिला आहे. दरम्यान, ज्या भाविक महिलांच्या पोत चोरल्या गेल्या आहेत, त्या तालुका पोलीस स्टेशनला आल्या असून पोलीस त्यांच्या तक्रारी लिहून घेत आहेत. तीन भाविक महिलांच्या ३९५ नुसार तक्रारी घेण्यात आल्या असून अजून काही महिला तक्रार देत आहेत. दरम्यान, पोत चोरणाऱ्या एकूण २७ संशयित महिला असून त्या सर्व मध्यप्रदेशातील इंदोर, सेंधवा तसेच इतर गावातील असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त होत आहे. दरम्यान, तालुका पोलीस स्टेशनला महिला भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.